‘टाइमपास २’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अभिनेत्री प्रिया बापटचा आगामी चित्रपट कोणता असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या प्रश्नाला पूर्णविराम देत आपण सचिन कुंडलकरसोबत पुन्हा एकदा एकत्र येणार आहोत, असे प्रिया बापटने स्पष्ट केले.
सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘हॅप्पी जर्नी’ या चित्रपटात पहिल्यांदा प्रिया बापटने कुंडलकर यांच्यासोबत काम केले.  या चित्रपटातील भूमिकेप्रमाणेच आव्हानात्मक आणि अगदी वेगळ्या धाटणीची भूमिका करण्याची संधी पुन्हा एकदा सचिन कुंडलकर यांच्या चित्रपटातून मिळाल्याबद्दल आपल्याला आनंद वाटत असल्याचे अभिनेत्री प्रिया बापट हिने ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले.
गेले काही दिवस ‘टाइमपास २’नंतर पुढचा चित्रपट कोणता? अशी विचारणा चाहत्यांकडून सातत्याने होत होती. मात्र, माझ्यासमोर येणाऱ्या पटकथा इतक्या विचित्र, काही ठोकळेबाज पद्धतीच्या होत्या की त्या पाहिल्यानंतर पुढे काय, हा प्रश्न आपल्यालाही छळत होता, असे प्रियाने सांगितले. यावर्षी ‘हॅप्पी जर्नी’ आणि ‘टाइमपास २’ हे दोन अगदी भिन्न शैलीतील चित्रपट करण्याची संधी मिळाली आणि या दोन्ही चित्रपटांनी अतुलनीय यश मिळवले. ‘टाइमपास २’ हा आपल्या कारकीर्दीतील गल्लापेटीवर सर्वात हिट ठरलेला पहिला चित्रपट आहे आणि त्याच वेळी ‘हॅप्पी जर्नी’सारख्या चित्रपटातूनही प्रेक्षकांनी आपल्याला तितक्याच सहजतेने स्वीकारले, याबद्दल आनंद वाटत असल्याचे प्रियाने सांगितले. मात्र, या यशामुळे प्रेक्षकांच्या आपल्याकडून अपेक्षाही वाढल्या असल्याने चित्रपटांची निवड फारच विचारपूर्वक करावी लागत असल्याचे तिने सांगितले.
‘दिग्दर्शक म्हणून सचिन कुंम्डलकरने माझ्यावर खूप विश्वास ठेवला आहे. त्याने आता मला जी भूमिका दिली आहे ती आजवरच्या भूमिकांमध्ये सर्वात आव्हानात्मक अशी भूमिका आहे. त्याच्या चित्रपटात नेहमीच काही तरी आव्हानात्मक करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळते. त्याच्या पटकथेच्या संकल्पनाही विलक्षण असतात. नव्या चित्रपटाची कल्पनाही आजवर प्रेक्षकांनी अनुभवलेली नाही, अशीच आहे. या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर मी पूर्णत: त्यावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले असून वर्षांला एक चित्रपट हे समीकरणही पक्के  केले आहे,’ असे प्रिया बापटने सांगितले.

उमेश आणि मला एकत्र काम करायचे आहे!
प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी लग्नानंतर ‘टाइमप्लीज’ या चित्रपटात एकत्र दिसली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी एकत्र काम केले नाही. त्या वेळी आमची ‘शुभंकरोती’ ही मालिका नुकतीच संपली होती. आम्ही ‘नवा गडी नवं राज्य’ हे नाटक एकत्र करत होतो आणि त्याचदरम्यान नाटकावर आधारित ‘टाइमप्लीज’ केला. आम्ही इतके एकत्र काम करत होतो की, त्यानंतर काही दिवस मुद्दाम एकत्र काम करणे आम्ही टाळले, असे प्रिया म्हणते. पण, आता खूप दिवस झाले आहेत. आम्हाला दोघांनाही एकत्र काम करायचे आहे पण, तशी ऑफरच कोणी देत नाही आहे, अशी तक्रारही प्रियाने केली.

Story img Loader