अभिनेत्री प्रिया बापटने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रिया सध्या तिच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजमुळे चांगलीच चर्चेत आहे. अलीकडेच प्रियाने ‘कर्ली टेल्स’च्या ‘तेरे गली मैं’ या लोकप्रिय कार्यक्रमात हजेरी लावली होती.
प्रियाने या कार्यक्रमात तिच्या बालपणीचे अनेक किस्से प्रेक्षकांना सांगितले. या वेळी अभिनेत्रीला एवढ्या लहान वयात ‘मुन्नाभाई MBBS’सारख्या चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता याबाबत विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना प्रिया म्हणाली, “मुन्नाभाई चित्रपटाच्या वेळी मी कॉलेजमध्ये होते तेव्हा मी बालकलाकार म्हणून काम करायचे त्यामुळे शूटिंगसाठी पोहोचल्यावर कोणाला कोणत्या नावाने हाक मारू काहीच कळत नव्हते. तेव्हा राजू सरांना मी तुम्हाला अंकल बोलू का? असे विचारले होते. त्यावर त्यांनी अजिबात नको, तू मला राजू बोल असे सांगितले होते.”
हेही वाचा : वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा ‘बवाल’ चित्रपट ओटीटीवर होणार रिलीज, कारण…
राजकुमार हिरानी यांच्यासारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? याबद्दल सांगताना प्रिया म्हणाली, “राजू सर खूप चांगले आहेत. एक दिग्दर्शक कलाकाराला घडवत असतो यावर माझा विश्वास आहे. माझ्या चेहऱ्यावरचा मेकअप पाहून त्यांनी पहिल्याच दिवशी हा ‘मेकअप का केलास? चेहरा धुवून टाक’ असे सांगितले होते. जशी आहे तशीच छान वाटतेस, असे सांगून राजू सरांनी मला डायलॉग कसे बोलावेत याविषयी मार्गदर्शन केले होते. ‘मुन्नाभाई MBBS’ चित्रपटातील एकाही सीनसाठी मी मेकअप केला नव्हता, ते दिवस फार सुंदर होते.”
हेही वाचा : रितेशने जिनिलीयाला पुन्हा घातली लग्नाची मागणी; नवऱ्याला उत्तर देत देशमुख वहिनी म्हणाल्या, “आता…”
दरम्यान, अलीकडेच प्रिया बापटच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ सीरिजचा तिसरा भाग प्रदर्शित झाला. यामध्ये तिने साकारलेल्या पौर्णिमा गायकवाड या भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मध्ये प्रियाशिवाय अतुल कुलकर्णी, एजाज खान, सचिन पिळगावकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.