Miss World 2024: २८ वर्षांनंतर भारतात काल, ९ मार्चला ७१वा ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा पार पडला. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेकशन सेंटरमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ही ‘मिस वर्ल्ड २०२४’ची विजेती ठरली. तर लेबनॉनची यास्मिना जायतौन ही पहिली उपविजेती ठरली. तसेच भारतीय सिनी शेट्टी टॉप-४ पर्यंत पोहोचू शकली नाही. आतापर्यंत कोणत्या भारतीय सौंदर्यवतींनी ‘मिस वर्ल्ड’चा खिताब जिंकला आहे? जाणून घ्या…
रीता फारिया पॉवेल (Reita Faria Powell)
रीताचा जन्म १९४५ साली मुंबईत झाला होता. वयाच्या २१व्या वर्षी तिने ‘मिस वर्ल्ड ११९६’चा क्राउन जिंकला होता. पहिल्यांदाच ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकून रीताने भारताचं नाव उंचावलं होतं. रीता ही फक्त भारताची पहिली ‘मिस वर्ल्ड’ नाही तर आशियाईची पहिली वहिली ‘मिस वर्ल्ड’ आहे. या स्पर्धेत तिला बेस्ट स्वीम सूट आणि बेस्ट इन इवनिंग गाउन यांसारख्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ‘मिस वर्ल्ड’ झाल्यानंतर तिला अनेक चित्रपटात काम करण्याच्या संधी आल्या होत्या. पण रीताने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर रीता लंडनला गेली. तिथे तिने किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमधून पुढील वैद्यकीय शिक्षण घेतलं. सध्या रीता पती डेव्हिड पॉवेलसह डब्लिनमध्ये राहत आहे.
ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai Bachchan)
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन १९९४ साली ‘मिस वर्ल्ड’ झाली होती. ही भारताची दुसरी सौंदर्यवती होती; जिने ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला होता. रीताने ‘मिस वर्ल्ड’ जिंकल्याच्या तब्बल २८ वर्षांनंतर भारताचं प्रतिनिधित्व करत ऐश्वर्या ‘मिस वर्ल्ड’ झाली होती. त्यामुळे जेव्हा ऐश्वर्या ‘मिस वर्ल्ड’ झाली तेव्हा भारतात एखादा उत्सव असल्याप्रमाणे जल्लोष केला होता. ‘मिस वर्ल्ड’ झाल्यानंतर ऐश्वर्याने मॉडलिंगमध्ये आपलं करिअर केलं. १९९७ साली मणिरत्नम यांच्या ‘इरुवर’ चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ऐश्वर्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटात काम केलं. याशिवाय तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व देखील केलं.
डायना हेडन (Diana Hayden)
ऐश्वर्यानंतर डायन हेडन १९९७ साली ‘मिस वर्ल्ड’ झाली. भारताच्या या तिसऱ्या ‘मिस वर्ल्ड’चा जन्म १९७३ साली हैदराबादमध्ये झाला होता. डायना शास्त्रीय नृत्यांगणा आहे आणि तिने सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी देखील घेतली आहे. ‘मिस वर्ल्ड’ झाल्यानंतर तिने अनेक टेलीव्हिजन जाहिराती आणि चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
युक्ता मुखी (Yukta Mookhey)
युक्ता मुखी ही भारताची चौथी सौंदर्यवती आहे, जिने ‘मिस वर्ल्ड’ जिंकलं होतं. १९९९ साली तिने ‘मिस वर्ल्ड’च्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. युक्ताचा जन्म बंगलोरमध्ये झाला होता. मुंबईच्या कॉलेजमधून तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये बॅचलर डिग्री मिळवली होती. याशिवाय युक्ताला शास्त्रीय संगीताचं ज्ञान आहे. यासाठी तिने तीन वर्ष शिक्षण घेतलं होतं. तसंच एड्सबाबत जनजागृती करण्यासाठीही तिने बरंच काम केलं आहे. युक्ता UNFPAची ब्रँड ॲम्बेसेडर होती.
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)
बॉलीवूड व हॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या प्रियांका चोप्राने २००२ साली ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला होता. ती भारताची पाचवी सौंदर्यवती आहे, जी ‘मिस वर्ल्ड’ झाली होती. वयाच्या १८व्या वर्षी प्रियांका ‘मिस वर्ल्ड’ जिंकली होती. यानंतर तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. मग एकामागून एक तिने सुपरहिट चित्रपट दिले. एवढंच नाहीतर तिने हॉलीवूडमध्येही काम केलं आहे. अभिनेत्री शिवाय प्रियांका एक निर्माती आणि उद्योजिका आहे. प्रियांकाने मराठी चित्रपट ‘व्हेंटिलेटर’ची निर्मिती केली होती.
मानुषी छिल्लर (Manushi Chillar)
२०१७ साली हरियाणाची मानुषी छिल्लर ‘मिस वर्ल्ड’ झाली होती. १५ वर्षांनंतर मानुषीने ‘मिस वर्ल्ड’च्या किताब जिंकून ती भारताची सहावी सौंदर्यवती ठरली. यानंतर मानुषीने प्रियांका चोप्राप्रमाणे बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं. या चित्रपटात मानुषी अक्षय कुमारबरोबर झळकली होती.