सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा २०२२ च्या सुरुवातीलाच आई झाली. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या मदतीने मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिच्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. प्रियांका आणि निक यांनी अद्याप त्यांच्या मुलीचा कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. मात्र आता निक- प्रियांकाच्या मुलीच्या नावाचा खुलासा झाला आहे. एवढंच नाही तर त्याचा अर्थही खूप खास आहे.
मीडिया रिपोर्टनुसार प्रियांका चोप्रानं खूपच विचार करून आपल्या मुलीचं नाव ठेवलं आहे. TMZ च्या रिपोर्टनुसार प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी आपल्या मुलीचं नाव मालती मेरी चोप्रा जोनस असं ठेवलं आहे. TMZ नं प्रियांकाच्या मुलीचं जन्म प्रमाणपत्र मिळाल्याचा दावा देखील केला आहे. या प्रमाणपत्रानुसार प्रियांका चोप्राच्या मुलीचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये जानेवारी महिन्यात झाला आहे.
दरम्यान अद्याप प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी त्यांच्या मुलीच्या नावाची पुष्टी केलेली नाही. मात्र प्रियांकानं आपल्या मुलीचं नाव ठेवताना दोन्ही संस्कृतींचा विचार केल्याचं बोललं जात आहे. मालती हे नाव संस्कृतमधून घेण्यात आलं आहे. ज्याचा अर्थ आहे ‘लहान सुगंधित फुल’ तर मेरी हे नाव लॅटिन भाषेतील स्टेला मॅरीसमधून घेण्यात आलं आहे. ज्याचा अर्थ समुद्राचा तारा असा आहे.
आणखी वाचा- KGF स्टार यशला करायचंय ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबत काम, कारणही आहे खास!
प्रियांका चोप्रानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आई झाल्याची गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली होती. तिनं लिहिलं, ‘आम्ही सरोगसीच्याद्वारे बाळाचं स्वागत केलं आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे क्षण आमच्यासाठी अतिशय खास आहेत आणि आम्हाला प्रायव्हसीची गरज आहे. कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे. आमच्या भावनांचा आदर कराल अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद.’