बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाच्या मागच्या अनेक दिवसापासून चर्चा सुरु आहे. अखेर आज, शनिवारी (१ डिसेंबर) हे दोघे विवाहबंधनात अडकले. त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले असून २ डिसेंबर रोजी पारंपारिक हिंदू पद्धतीने लग्न करणार आहेत. जोधपुरमधल्या आलिशान उमेद भवनमध्ये निक आणि प्रियांकाने सहजीवनाच्या आणाभाका घेतल्या. यावेळी निक आणि प्रियांकाचे जवळचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे बॉलिवूडची ही अभिनेत्री आता अधिकृतपणे अमेरिकेची सून झाली.
दीपिका -रणवीर यांच्या लग्नानंतर चाहत्यांना प्रियांकाच्या लग्नाचे वेध लागले होते. त्यामुळे चाहत्यांप्रमाणेच कलाविश्वातील सेलेब्रिटींमध्येही या जोडीच्या लग्नाची चर्चा रंगली होती. अगदी मोजक्या आणि ठराविक पाहुण्यांच्या उपस्थित पार पडलेल्या या विवाहसोहळ्यामध्ये सारं काही खास होतं. अगदी जेवणापासून ते या जोडीच्या कपड्यांपर्यंत सारखं काही खास होतं. विशेष म्हणजे या प्रत्येक गोष्टीची चर्चा आतापर्यंत रंगत होती.
Priyanka Chopra and Nick Jonas are now man and wife
Read @ANI Story | https://t.co/IPvWMYIBC0 pic.twitter.com/567b24vJ9R
— ANI Digital (@ani_digital) December 1, 2018
प्रियांकाने तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीमध्ये बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास केला. या प्रवासामध्येच तिला निक जोडीदार म्हणून लाभला आणि अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. हा लग्नसोहळा स्मरणात रहावा यासाठी या दोघांनीही विशेष लक्ष दिल्याचं पाहायला मिळालं. जोधपूरमधल्या उमेदभवन येथे ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलेल्या या जोडीने पाहुण्यांसाठीची विशेष खातीरदारी केली. लग्नात येणाऱ्या विदेशी पाहुण्यांना पारंपारिक भारतीय पद्धतीचे कपडे परिधान करता यावे यासाठी प्रियांकाने खास डिझायनरची नेमणूक केली होती. इतकंच नाही तर या वऱ्डाही मंडळींसाठी उमेदभवनापर्यंत पोहोचण्यासाठी चॉपर आणि हेलिपॅडचीही सोय केल्याचं दिसून आलं. एकंदरीतच हा विवाहसोहळा दैदिप्यमान असल्याचं दिसून आलं.
दरम्यान, या लग्नामध्ये शाही थाटासोबत सुरक्षेचीही तितकीच काळजी घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं. निक-प्रियांकाच्या लग्नाचे फोटो किंवा तत्सम माहिती बाहेर जाऊ नये याकडे विशेष लक्ष देण्यात आलं. आज ख्रिश्चन पद्धतीने लग्न झाल्यानंतर २ डिसेंबर रोजी ही जोडी पारंपारिक हिंदू पद्धतीने लग्न करणार आहे. त्यानंतर हा शाहीसोहळा पार पडल्यावर प्रियांका निक मुंबई आणि दिल्लीत ग्रँट रिसेप्शनचं आयोजन करणार आहेत.