केवळ हिंदीच नाही तर अमेरिकेतील इंग्रजी अभिनय क्षेत्राच्या माध्यमातून जगभरामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनासने घेतलेल्या एका निर्णयामुळे तिचे चाहते संभ्रमात पडलेत. प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन जोनास हे तिचे सासरचे आडनाव अचानक वगळले आहे. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरुन जोनास हे नाव वगळले असून आता केवळ प्रियांका एवढंच नाव ठेवलं आहे. प्रियांकाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे तिच्यात आणि तिच्या पतीदरम्यान म्हणजेच अभिनेता, गायक निक जोनासदरम्यानचे संबंध बिघडल्याच्या अफवा उठल्यात.
प्रियांकाने मात्र अचानक सासरचं आडनाव का वगळलं याबद्दल कोणतीही पोस्ट केलेली नाही. प्रियांका किंवा तिच्या टीमने याबद्दलची कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही. भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री अचानक प्रियांकाच्या हॅण्डलसमोरील जोनास आडनाव काढून टाकण्यात आले.
यानंतर सोशल मीडियावर प्रियांका आणि निकमध्ये काहीसतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं असून प्रियांका वेगळं होण्याचा निर्णय तर घेत नाहीय ना?, प्रियांका आणि निकमध्ये काही वाद झालाय का? या दोघांमध्ये नक्की काही घडलंय का?, असे अनेक प्रश्न या दोघांचे चाहते विचारत आहे.
प्रियांका आणि निक जोनासचं २०१८ साली मोठ्या थाटामाटात राजस्थानमधील जोधपूर येथील शाही राजवाड्यात हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनं लग्न झालं होतं. तेव्हापासून हे दोघे एकत्रच राहतात. याच वर्षी प्रियांका आणि निकने त्यांच्या नवीन घरामध्ये दिवाळी साजरी केली. या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट करत प्रियांकाने “आमच्या पहिल्या घरामध्ये पहिली दिवाळी. ही दिवाळी आमच्यासठी कायम स्पेशल राहील. ही संध्याकाळ अविस्मरणीय बनवण्यासाठी कष्ट घेतलेल्या प्रत्येकाचे आभार. तुम्ही सर्व माझ्यासाठी देवदूताप्रमाणे आहात. आमचे घर आणि माझ्या संस्कृतीचा आदर केवळ कपडे परिधान करुन न करता थेट नृत्य करुन आमच्या आनंदात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचे आभार. तुम्ही मला घरी असल्यासारखं भासवलं. तसेच सर्वात भारी नवरा आणि जोडीदार निक जोनासचेही आभार. तू स्वप्नांपासून बनलेला माणूस आहेस. आय लव्ह यू. आज माझा उर आनंदाने भरुन आलाय,” असं प्रियांका म्हणाली होती.
दरम्यान प्रियांकाने अचानक जोनास हे आडनाव वगळण्यामागील कारणांबद्दल कोणताही खुलासा केलेला नसला तरी तिच्या आईने यावर पहिली प्रतिक्रिया दिलीय. मात्र प्रियांकाच्या आईने यासंदर्भात न्यूज १८ डॉट कॉमशी बोलताना भाष्य केलंय. मधू चोप्रा यांनी प्रियांका आणि निकच्या नात्यात दुरावा आल्याच्या अफवा फेटाळून लावल्यात. “या चर्चा अर्थहीन आहेत, अफवा पसरवू नका,” असं मधून चोप्रा म्हणाल्यात.