बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्राने हॉलीवूडमध्येही दमदार कामगिरी केली. तिच्या या यशामध्ये अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
‘ब्रिटीशवॉग’ या मॅगझिनच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या आवृत्तीमध्ये जगातल्या २७ मोठ्या स्टार्सच्या यादीमध्ये तिचंही नाव आलं आहे. व्हिओला डेविस, रिझ अहमद, केट विनस्लेट, आन्या टेलर जॉय, टॉम हॉलंड आणि साशा बरॉन कोहेन यांच्यासोबत तिचंही नाव आता या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. या मॅगझिनने तिला फीचर केलं आहे.
View this post on Instagram
प्रियांकाला तिच्या आवडीनिवडींविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी तिला हेही विचारण्यात आलं की, कोणता हॉलीवूड कलाकार तिला सगळ्यात जास्त आवडतो. त्यावेळी तिने सोफिया लोरेन या इटालियन अभिनेत्रीचं नाव घेतलं. “तिच्यात मी मला पाहते, दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये, दोन वेगवेगळ्या देशांमध्ये काम करणारी” ,असं उत्तर दिलं.
या व्यवसायापूर्वीच्या करिअर चॉईसबद्दल विचारलं असता ती म्हणाली, “मला ऍरोनॉटिकल इंजिनीयर व्हायचं होतं. मला विमानांचं फार आकर्षण होतं. मला विज्ञान आवडायचं, गणित आवडायचं. मला फिजिक्सचीही आवड आहे.”
प्रियांकाचा ‘द व्हाईट टायगर’ हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला चित्रपट भरघोस यश मिळवत आहे. या वर्षीच्या बाफ्टा म्हणजेच ब्रिटीश अकॅडमी फिल्म, टेलिव्हिजन, आर्ट पुरस्कारासाठी दोन विभागांमध्ये नामांकनं मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता या विभागात आदर्श गौरव याला नामांकन आहे तर सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी रामीन बहरानी यांना नामांकन मिळालं आहे.
View this post on Instagram
बाफ्टा पुरस्काराची नामांकनं जाहीर झाल्यानंतर प्रियांकाने आनंदात काही ट्वीट्स केले होते. संपूर्ण भारतीय कलाकार असलेल्या चित्रपटाला २ नामांकनं मिळाल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचं सांगितलं. तर अभिनेता आदर्श गौरव याचं अभिनंदनही तिने केलं आहे.
प्रियांका सध्या ‘सीटाडेल’, ‘टेक्स्ट फॉर यू’ आणि ‘द मॅट्रिक्स ४’ या कार्यक्रम- चित्रपटांच्या कामात व्यस्त आहे.