मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com
हिंदी सिनेमातील आघाडीची नायिका अमेरिकन टीव्हीविश्वामध्ये पदार्पण करते आणि एका मालिकेत मुख्य पात्राची भूमिका साकारते, ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. पण प्रियांकाभोवती फिरताना मालिकेचं कथानक, तिचा दर्जा याबद्दल बरेच प्रश्न उभे राहतात.
हिंदी सिनेमातील आघाडीची नायिका प्रियांका चोप्राने थेट अमेरिका गाठत दोन इंग्रजी गाण्यांचे अल्बम प्रकाशित केले. त्यानंतर ‘क्वान्टिको’ मालिकेमध्ये तिची वर्णी मुख्य भूमिकेसाठी लागली हा भारतीयांसाठी कौतुकाचा विषय होता. गुप्तचर विभाग हा लोकांचा प्रचंड कुतूहलाचा विषय. त्यावर जगभरात भरपूर पुस्तकं, मालिका, सिनेमे झाले आहेत. जगभरातील गुप्तचरांची कामाची पद्धत, त्याचं नेटवर्क, कारवाया, ओळख, मिशन यांच्याबद्दल जनमानसात कुतूहल आहे. ही मालिका अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआय म्हणजेच फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि सीआयए म्हणजेच सेन्ट्रल इंटेलिजन्स एजन्सी यांच्याभोवती फिरते. पहिल्या पर्वापासून या मालिकेला मिश्र प्रतिसाद मिळत गेला. पण हॉलीवूड आणि अमेरिकन मालिका विश्वात भारतीय व्यक्तिरेखा किंवा ब्राऊन पीपल संकल्पनेभोवतीचे ठोकळेबाज समज मोडून काढत एखाद्या मालिकेचं तिसरं पर्व घेऊन येणं, ही नक्कीच कौतुकाची बाब आहे. याचं श्रेय प्रियांकाला द्यायलाच हवं.
शहराच्या मध्यवर्ती परिसरात नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटात कोसळलेल्या ग्रॅण्ड सेन्ट्रल इमारतीच्या अवशेषात बेशुद्ध पडलेल्या अॅलिश पेरिशला जाग येते आणि मालिकेला सुरुवात होते. नक्की काय झालं आणि आपण त्या इमारतीत कसं पोहचलो, याचा गुंता अॅलिश सोडवतच असते की, तिच्यासमोर एक नवा प्रश्न उभा राहतो. बॉम्बस्फोटाच्या संशयित यादीमध्ये तिच्यासकट एफबीआयच्या क्वान्टिकोमधील प्रशिक्षण केंद्रात एजंटपदाचं प्रशिक्षण घेणाऱ्या तिच्या सहकाऱ्यांची नावं असतात. त्यामुळे क्वान्टिकोमधील तिच्या प्रवेशाच्या दिवसापासून झालेल्या घटनांची उजळणी करून खऱ्या गुन्हेगाराचा शोध घ्यायची जबाबदारी तिच्यावर येते. एफबीआयसोबत तिचे सहकारी, त्यांची वागणूक, भूतकाळ यातून हल्ल्याचे धागेदोरे शोधत असतानाच तिच्या घरात एफबीआयला स्फोटके सापडतात आणि बंदुकीच्या गोळीने जखमी झालेला एजंट रायन भेटतो. साहजिकच आता संशयाची सुई थेट अॅलिशकडे वळते. एकदा एफबीआयने चौकशीसाठी आपल्याला आत घेतलं, तर प्रयत्न करूनही आपली सुटका होणार नाही आणि खऱ्या गुन्हेगाराचा शोध घेता येणार नाही, हे पक्कं माहीत असल्याने अॅलिश तिथून पळ काढते आणि एकटीच गुन्हेगाराच्या शोधात लागते. क्वान्टिकोमध्ये तिच्यासोबत शिकणाऱ्या एजंट्सपकी एकाचा हात या हल्ल्यामध्ये आहे, हा एकमेव दुवा तिच्याकडे असतो. त्या आधारावर मालिका वर्तमानकाळ आणि त्यांच्या प्रशिक्षणाचा नऊ महिन्यांचा काळ या दोन पातळ्यांवर समांतर धावते.
मालिकेच्या निर्मात्यांना सुरुवातीपासून या मालिकेत फक्त अमेरिकन गौरवर्णीय कलाकार नको होते. त्यामुळे पात्रांची निवड करताना त्यांनी धर्म, वर्ण यांचा आवर्जून विचार केला. प्रियांकाची मालिकेतील निवड याच कारणामुळे झाली. भारतीय वंशाच्या अॅलिशसोबत सीरिया युद्धात नाहक अडकलेला ज्यूधर्मीय सायमन, जुळ्या असल्याने एका वेगळ्या प्रयोगानिमित्त एफबीआयमध्ये दाखल झालेल्या मुस्लीम रायना-निमा, अफगाणिस्तान आणि बऱ्याच देशांमध्ये एफबीआयसाठी काम केल्याचा अनुभव असलेला एजंट रायन, नाइन इलेव्हनच्या हल्ल्यात आईवडील गमावलेली बडय़ा घरातील शेल्बी, आईवडील एफबीआयमध्ये असल्याने घरात बिनकामाचा असा शिक्का बसलेला केलब अशी वेगवेगळी पाश्र्वभूमी असलेल्या व्यक्तिरेखा यात आहेत. देशाची सेवा या मुख्य कारणाव्यतिरिक्त यातील प्रत्येकाकडे एफबीआयमध्ये शिरण्याचं वैयक्तिक कारण आहे. लहानपणी दारूच्या नशेत आईला मारहाण करणाऱ्या बापापासून आईला वाचवताना तिच्या हातून वडिलांना गोळी लागते आणि त्यांचा मृत्यू होतो. इतकी वष्रे बापाची खलनायकी बाजू पाहत वाढलेल्या अॅलिशच्या हाती त्यानंतर त्याचं एफबीआयचं ओळखपत्र लागतं आणि ती वडिलांच्या या अनोळखी रूपाच्या शोधात गुंतते. याचवेळी वर्तमानात बॉम्बस्फोटाच्या मुख्य सूत्रधाराला शोधणाऱ्या अॅलिशभोवतीचं संशयाचं वलय वाढत जातं. क्वान्टिकोमध्ये एकत्र शिकलेल्या तिच्या सहकाऱ्यापकी बहुतेकजण तिच्या विरोधात उभे राहतात. क्वान्टिकोमधून बाहेर पडल्यावर प्रत्येकाची आयुष्ये बदललेली असतात. एकमेकांशी केलेला दगाफटका, वाद, प्रेम या सगळ्याचे पडसाद उमटायला लागतात.
मालिकेच दुसरं पर्व अॅलिश आणि रायनच्या सीआयएच्या प्रवेशापासून होतं. सीआयएच्या प्रशिक्षण केंद्रातील काही निवडक विद्यार्थ्यांना कट्टर राष्ट्रवादी बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा सुगावा एफबीआयला लागतो. त्यामुळे संबंधित व्यक्तीला शोधून त्याच्या मोहिमेला वेळीच आवर घालायची जबाबदारी या दोघांवर येते. याचवेळी जी-ट्वेंटी बठकीत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसोबत बडय़ा राजकीय नेत्यांना ओलीस धरणाऱ्या दहशतवाद्यांच्या तावडीतून सगळ्यांची सुटका करायची जबाबदारी अॅलिशवर येते. मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात तेजीत झाली असली, तरी नंतर तिची लोकप्रियता ओसरू लागली. पहिल्या पार्वतील एफबीआय आणि दुसऱ्या पर्वातील सीआयए प्रशिक्षण केंद्र, पुन्हा तेच सराव, नातेसंबंध, वाद यात प्रेक्षकांना तोचतोचपणा जाणवायला लागला. त्यामुळे या पर्वाला नव्या कथानकाची जोड दिली गेली. जी-ट्वेंटीवरील हल्ल्याचे सूत्रधार अमेरिकन राजकीय वर्तुळात वावरत असल्याचा सुगावा राष्ट्राध्यक्षांना लागतो आणि त्यांना हुडकायची जबाबदारी अॅलिश आणि टीमवर येते. सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या पर्वात अॅलिश तीन वर्षांनंतर एफबीआयमध्ये ओढली गेली आहे.
पुरुष गुप्तहेरी मालिकांपेक्षा ही मालिका वेगळी ठरण्याचं मुख्य कारण केवळ अॅलिशचं नायिका असणं नाही. तर मालिकेचं लिखाणही स्त्रीवादी नजरेतून केलं आहे. त्यामुळे फक्त केस, मिशन या पलीकडे मालिकेला भावनिक किनारही आहे. अगदी अॅलिशचं पात्रही रूक्ष नाही, तिला अनेक कांगोरे आहेत. ती पटकन रिअॅक्ट होते. घाईने घेतलेल्या निर्णयात कधी तरी अडकतेसुद्धा, पण ती तितकीच हेकेखोरसुद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक प्रसंगात हिरोपणा मिरवण्याचा शिक्का तिच्यावर लागतो. ती कित्येकदा विश्वासातील व्यक्तींना काहीही न सांगता निर्णय घेते. पण ती तितकीच हुशार आहे. एखाद्या बाबीतील इतरांना न दिसलेली बाजू तिला दिसते. कितीही वाद, भांडणं झाली तरी मित्रांना जोडून ठेवायचा तिचा प्रयत्न असतो. रायन आणि तिचं एकमेकांवर निस्सीम प्रेम असतं. पण एफबीआयमध्ये काम करताना होणारे वाद, मतांतरे, रायनचा पुरुषी अहंकार यामध्ये नात्यात कडवटपणा येऊ नये म्हणून माघार घ्यायचा निर्णयसुद्धा ती घेते. नाइन इलेव्हनच्या हल्ल्याचे पडसाद मालिकेवर पडतात. पहिल्या पर्वातील हल्ला हा या हल्ल्यानंतर झालेला असतो. त्यात अॅलिशच्या ब्राऊन आणि निमा-रायनाच्या मुस्लिम असण्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. त्यामुळे हल्ल्यानंतर अॅलिशच्या दिशेने उभी राहिलेली संशयाची सुई अजून तीक्ष्ण होते. सीरिया युद्धात गरसमजापोटी दहशदवाद्यांमध्ये अडकलेल्या पण नंतर बाहेर पडलेल्या सायमनच्या प्रामाणिकपणावरसुद्धा यामुळे शंका घेतली जाते. नाइन इलेव्हननंतर अमेरिकन समाजात निर्माण झालेलं भीती आणि अविश्वासाचं वादळ मालिकेत व्यवस्थित पकडलं आहे.
या मालिकेच्या कथानकाबद्दल समीक्षक, प्रेक्षकांच्या मिश्र प्रतिक्रिया असल्या, तरी प्रियांकाच्या अभिनयाची प्रचंड तारीफ झाली. तिला या मालिकेनिमित्त दोनदा प्रतिष्ठित पीपल चॉईस अवॉर्ड मिळाला आहे. तिनेही अमेरिकेत वाढलेली भारतीय वंशाची मुलगी साकारण्यासाठी तेथील भाषेचा लहेजा, वागण्याची पद्धत व्यवस्थित पकडली आहे. याआधी अमेरिकन टीव्हीवरील भारतीय पात्रे ठरावीक लहेजात, संकोचित विचारसरणीने साकारली गेली आहेत. प्रियांकाने यात भारतीयत्वाचं विडंबन होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. अॅलिशच्या हातातील ॐचं ब्रेसलेट आणि काही भावनिक दृश्यांमध्ये वापरलेला बॉलीवूड पठडीचा किंचित अधिक मेलोड्रामा इतकीच तिच्या भारतीयत्वाची ओळख मालिकेत दिसते. पण त्याचवेळी या मालिकेनिमित्ताने दिलेल्या मुलाखतींमध्ये प्रियांकाने वेळोवेळी भारत, तसंच िहदी सिनेसृष्टीबद्दल अमेरिकेत असलेले गरसमज खोडले. तिथे तिला सहन करावा लागलेला भेदभाव, कृष्णवर्णीयांबद्दलची तिथली दुटप्पी भूमिका, स्त्री आणि पुरुष कलाकारांमध्ये जगभर केला जाणारा भेदभाव अशा किती तरी विषयांवर तिने आपली परखड मतं मांडली. तसंच खोडकर, स्टायलिश वागण्यातून अमेरिकन मीडियाला आपल्या प्रेमातही पाडलं. त्यामुळे ऑस्कर, मिट गाला आणि काही बडय़ा पुरस्कार सोहळ्यांमध्ये, टीव्ही शोमध्ये प्रियांकाची हजेरी चच्रेत असते. अजूनही विचारपूर्वक निवडलेले हॉलीवूड सिनेमे, तिचा अमेरिका ते भारत असा सततचा चालू राहणारा प्रवास, अभिनेत्री ते निर्माती ही वाटचाल पाहता अॅलिशपलीकडची प्रियांका अमेरिकेत लक्षात राहील, असं दिसतंय.
सौजन्य – लोकप्रभा