आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांकडून डिनर पार्टीचे आमंत्रण आले आहे. परंतु, कामात प्रचंड व्यग्र असलेली ही ‘देसी गर्ल’ या डिनर पार्टीला उपस्थित राहील अथवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘क्वांटिको’ या अमेरिकन शोमुळे प्रियांकाची जगभरात छाप पडली असून, दिवसेंदिवस तिच्या प्रसिद्धी वलयात वाढ होताना दिसते. ओबामा दर वर्षी व्हाईट हाऊसमध्ये डिनरच्या खास कार्यक्रमाचे आयोजन करतात. यावेळी व्हाईट हाऊसमधील डिनर पार्टीत सहभागी होण्यासाठी बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपला प्रभाव पाडणाऱ्या प्रियांकालादेखील आमंत्रित करण्यात आले आहे. बराक ओबामा आणि मिशेल ओबामा हे या भोजन समारंभाचे यजमापद भूषवितात. प्रियांका कामात अत्यंत व्यग्र असल्याने बराक ओबामांनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीतील तिच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमेरिकी टीव्ही शो ‘क्वांटिको’ आणि ‘बे वॉच’ या हॉलिवूडपटात व्यग्र असलेल्या प्रियांकाकडून या भोजन समारंभास उपस्थित असण्याबाबत अद्याप पुष्टी करण्यात आली नसल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीत म्हटले आहे.