आपल्या प्रत्येक चित्रपटातील व्यक्तिरेखेवर अभ्यास करून विशेष लक्ष देण्याऱ्या बॉलिवूडमधील काही मोजक्या कलाकारांमध्ये प्रियांका चोप्राचे नावही सध्या समाविष्ट होत आहे. ‘मेरी कोम’ असो किंवा ‘बर्फी’ तिच्या प्रत्येक भूमिकेसाठी प्रियांकाने घेतलेली मेहनत पडद्यावर दिसून आली आहे. सध्या ती संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे आणि या चित्रपटासाठी तिने खास पेशवाई ढंगातील मराठी भाषेचे धडे गिरवायला सुरवात केली आहे.
‘गोलियों की रासलीला- रामलीला’ या चित्रपटाच्या यशानंतर लगेचच संजय लीला भन्साळी यांनी आपला मोहरा पेशवे काळातील बाजीराव आणि मस्तानी यांच्या अजरामर प्रेमकहाणीकडे वळवला आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण बाजीराव आणि मस्तानीच्या भुमिकेत दिसून येणार असून प्रियांका बाजीराव पेशव्यांची पत्नी काशीबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या या चित्रपटातील लूकची पहिली झलकही तिने नुकतीच सोशल मीडीया साईटवर टाकली होती. आता या चित्रपटातील भूमिकेसाठी खास पेशवेकालीन मराठी भाषा शिकण्यासाठी प्रियांकाने शिकवण्या लावल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी सुद्धा ‘अग्निपथ’ आणि ‘कमिने’ या चित्रपटांमध्ये प्रियांकाने मराठी मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. यावेळी स्वत: संजय लीला भन्साळी यांनी चित्रकरणाच्या दरम्यान कोणत्याही कलाकाराला मराठी भाषा आणि ती बोलण्याची ढब आत्मसात करताना अडचण होऊ नये म्हणून एका प्रशिक्षकाची नेमणूक सेटवर केली आहे. या प्रशिक्षकाकडून प्रियांकाही पुढील १५ दिवसांसाठी मराठीचे धडे गिरवणार असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट भन्साळी यांच्यासाठी महत्त्वाचा चित्रपट आहे. त्यामुळे त्यांच्यासह प्रत्येक कलाकार चित्रपटासाठी विशेष मेहनत घेत आहेत. आधी रणवीर सिंगने या चित्रपटासाठी आपले डोके भादरले आणि आता प्रियांका या चित्रपटासाठी मराठी शिकते आहे. आता मस्तानीच्या भूमिकेतील दीपिका या चित्रपटासाठी काय करते हे पहाणे उत्सूकतेचे ठरेल.

Story img Loader