राष्ट्रीयपुरस्कार विजेती अभिनेत्री प्रियांका चोप्राने बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. लवकरच प्रियांकाचा ‘मेरी कोम’ चित्रपट प्रदर्शित होत आहे, त्याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे समजते. याबाबतच्या टि्वटरवरील संदेशात ती म्हणते, राष्ट्रपती भवनाला भेट देणे हे नेहमीच सुखावह असते. मला त्यांच्या घरी येण्याची संधी दिल्याबद्दल प्रणवदा आणि सौरमा यांचे आभार. पाच वेळा बॉक्सिंग चॅम्पियन आणि ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक मिळवून भारताची मान गर्वाने उंचावणाऱ्या मेरी कोमच्या आयुष्यावर बनविण्यात येत असलेल्या ‘मेरी कोम’ नावाच्या चित्रपटात प्रियांका मेरी कोमची व्यक्तिरेखा साकारत आहे. या चित्रपटाच्या दोन दिवसाच्या प्रसिद्धी कार्यक्रमासाठी प्रियांका राजधानीत आली होती. ओमंग कुमारचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचा ‘टोरॅन्टो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये गुरुवारी प्रिमिअर होणार असून, प्रियांका टोरॅन्टोला रवाना झाली. संजय लीला भन्साळी आणि ‘वायकॉम १८ मोशन पिक्चर्स’ची संयुक्त निर्मिती असलेला हा चित्रपट शुक्रवारी जगभरात प्रदर्शित होत आहे.

Story img Loader