‘क्वांन्टिको’ या अमेरिकन थरार मालिकेमध्ये प्रियंका चोप्रा एका एफबीआय एजंटची भूमिका साकारत आहे. सदर भूमिकेसाठी तिचे ‘पिपल्स चॉईस अॅवॉर्ड’ पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. पदार्पणातच प्रियंकाला नामांकन मिळाल्याने ती आनंदीत आहे. हा आनंद प्रियंकाने ट्विटरवरून चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
येत्या तीन नोव्हेंबरपासून या पुरस्काराकरता प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकाराला मतदान करता येणार आहे. ‘क्वांन्टिको’ या मालिकेत प्रियंकासोबत जॅक मॅक्लाघ्लीन, टेटे एलिंग्टन, ग्रॅहेम रोजर्स हे कलाकारही आहेत. ‘क्वांन्टिको’ या मालिकेमध्ये प्रियंका व तिचे सहकलाकार हे व्हर्जिनियातील एफबीआय एजंटची भूमिका साकारत असून मालिकेत त्यांच्या भूतकाळाबाबत गुप्तता दर्शविण्यात आली आहे.
हा पुरस्कार चित्रपट, मालिका, संगीत क्षेत्रातील कलाकारांना त्यांच्या चाहत्यांनी केलेल्या मतदानाच्या आधारे दिला जातो. ‘पिपल्स चॉईस अवॉर्ड’च्या संकेतस्थळावर नामांकन मिळालेल्या आणि पुरस्कृत कलाकारांची नावे जाहीर केली जातात.