रूपेरी पडद्यावरील अभिनेत्री-अभिनेते अनेक चित्रपटांतून झळकत असले तरी बहुतांशी कलावंतांचा एखादाच चित्रपट एवढा गाजतो आणि प्रेक्षकांना आवडतो की तो चित्रपट त्या कलावंतांची ओळख बनून जातो. मधुर भांडारकरच्या २००८ साली आलेल्या ‘फॅशन’मुळे प्रियांका चोप्राला स्वतंत्र ओळख मिळाली. तिच्या अभिनयाचे कौतुक तर झालेच; त्याचबरोबर सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटानंतर ती एकदम स्टारपदी जाऊन बसली. मेघना माथूर ही व्यक्तिरेखा हीच जणू प्रियांका चोप्राची ओळख बनली. या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. आता ‘फॅशन’च्या सिक्वेलची चर्चा सुरू झाली असून त्यात मात्र प्रियांकाऐवजी दीपिकाचा विचार मधुर भांडारकर करतोय, अशी जोरदार चर्चा आहे.
२००७ साली दीपिकाने ‘ओम शांती ओम’द्वारे पदार्पण केले आणि २०१३ सालात तर ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘रेस २’ आणि ‘ये जवानी है दीवानी’ असे तीन सुपरडुपर हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळेच बहुधा मधुरला ‘फॅशन’च्या सिक्वेलमध्ये प्रियांकाऐवजी दीपिकाच हवी आहे. मधुरने हा सिक्वेल बॉलीवूडची आघाडीची चित्रपट निर्मिती संस्था धर्मा प्रॉडक्शन्सने करावा यासाठी करण जोहरकडे विचारणा केली आहे.
लागोपाठ सुपरहिट चित्रपट दिल्यामुळे बॉलीवूड वितरक-वित्त साहाय्यक तसेच चित्रपटांसाठी निधी गुंतवणूक करणारे लोक यांच्यामध्ये दीपिकाचा भाव तुफान वधारला आहे. अर्थात प्रियांकाऐवजी दीपिकाला घेण्याचे मधुरने ठरवावे यामागे आणखीही निराळे कारण असल्याचीही चर्चा रंगली आहे. चांगल्या अभिनयापेक्षा, भूमिकेला न्याय देणाऱ्या कलावंतापेक्षा अलीकडे १०० कोटी क्लब, अधिक मोठे, सध्या गाजत असलेले कलावंत असले चित्रपट उच्च निर्मितीमूल्य आणि भरपूर बोलबाला करण्यासाठी उपयुक्त ठरते, अशी नफ्याची गणितेच हल्ली चित्रपटामागे अधिक असतात. आगामी महिन्यात प्रियांकाचा ‘क्रिश थ्री’ हा एकमेव चित्रपट प्रदर्शित होतोय. नंबर वनच्या स्पर्धेत प्रियांका असली तरी सध्या दीपिकाने तीन सुपरहिट चित्रपट देऊन आघाडी घेतली आहे, हेही तेवढेच खरे आहे.
उगवत्या सूर्याला दुनिया नेहमीच सलाम करते. बॉलीवूडमध्ये तर कलावंत, निर्माते-दिग्दर्शक किंवा अन्य कुणीही असोत, त्यांचे रंगढंग सरडय़ासारखे बदलतात. त्यामुळे आपल्या अभिनयाने प्रियांकाने ‘फॅशन’ गाजवला असला तरी सिक्वेलमध्ये मधुर तिला डावलून दीपिकाला घेतोय यावरून मधुर-प्रियांका यांच्यात वितुष्ट आले असावे हे कारणही असू शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा