बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केले. प्रियांकाने लग्न केल्यानंतर तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन निक जोनासचे आडनाव लावले होते. प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन जोनास हे तिचे सासरचे आडनाव अचानक वगळले आहे. यामुळे आता प्रियांका लवकरच घटस्फोट घेणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र या सर्व चर्चांमध्ये प्रियांकाने नुकतंच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाआहे. यात ती तिचा पती निक जोनस आणि दिरांसोबत एका कार्यक्रमात दिसत आहे. यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

प्रियांकाने मंगळवारी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ‘द जोनस ब्रदर्स फॅमिली रोस्ट’ या शो दरम्यानचा आहे. यात प्रियांका ही स्टेजवर उभी दिसत आहे. तर दुसरीकडे निक जोनस आणि त्याचे भाऊ बसलेले दिसत आहे.

या व्हिडीओत प्रियांका म्हणते, “आज रात्री मी इथे आहे त्याचे कारण म्हणजे माझा पती निक जोनस आणि त्याचे भाऊ यांना मला रोस्ट करायचे आहे. त्यामुळे मला फार सन्मानित आणि उत्साहित वाटत आहे. मला कधीकधी निक जोनसच्या भावांची नावदेखील आठवत नाही. मी एक भारतीय मुलगी आहे. भारत हा एक असा देश आहे जो संस्कृती, संगीत आणि मनोरंजन या सर्वच क्षेत्रात समृद्ध आहे. त्यामुळे जोनस ब्रदर्स हे त्या ठिकाणी काहीही करु शकले नाही.” असेही ती गमतीत म्हणाली.

“निक जोनस आणि माझ्यामध्ये तब्बल १० वर्षांचा फरक आहे आणि त्याला ९० च्या दशकातील पॉप संस्कृतीची बरीच उदाहरणं समजत नाहीत. पण मला ती समजतात. त्यानंतर मी त्याला ते समजावून सांगत असते. यातून एक गोष्ट चांगली घडते ते म्हणजे आम्ही दोघं एकमेकांना शिकवत असतो. अनेकदा जोनस मला टिक टॉक कसा वापरायचा हे शिकवतो आणि मी त्याला यशस्वी अभिनय कारकिर्दीसाठी काय करावे लागते हे शिकवते,” असे तिने यावेळी सांगितले.

यानंतर सोशल मीडियावर प्रियांका आणि निकमध्ये काहीसतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं असून प्रियांका वेगळं होण्याचा निर्णय तर घेत नाहीय ना?, प्रियांका आणि निकमध्ये काही वाद झालाय का? या दोघांमध्ये नक्की काही घडलंय का?, असे अनेक प्रश्न या दोघांचे चाहते विचारत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका चोप्राने तिच्या तिचे आडनाव वगळण्यामागे जोनस ब्रदर्सचा रोस्ट शो असल्याचे बोललं जात आहे. ‘द जोनस ब्रदर्स फैमिली रोस्ट’ या शोला प्रमोट करण्यासाठी तिचे आडनाव हटवल्याचे बोललं जात आहे. हा रोस्ट बेस्ड शो असून मंगळवारी २३ नोव्हेंबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा : प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचं बिनसलं?; प्रियांकाच्या ‘त्या’ मोठ्या निर्णयानंतर तिची आई म्हणते, “या चर्चा…”

दरम्यान प्रियांकाने अचानक जोनास हे आडनाव वगळण्यामागील कारणांबद्दल कोणताही खुलासा केलेला नसला तरी तिच्या आईने यावर पहिली प्रतिक्रिया दिलीय. मात्र प्रियांकाच्या आईने यासंदर्भात न्यूज १८ डॉट कॉमशी बोलताना भाष्य केलंय. मधू चोप्रा यांनी प्रियांका आणि निकच्या नात्यात दुरावा आल्याच्या अफवा फेटाळून लावल्यात. “या चर्चा अर्थहीन आहेत, अफवा पसरवू नका,” असं मधून चोप्रा म्हणाल्यात.