संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘पिंगा’ हे दुसरे गाणे प्रदर्शित झाल्यापासून एकूणच सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली पेशव्यांच्या इतिहासाचा दिग्दर्शकाने खेळखंडोबा केला असल्याची टीका समाजमाध्यमातून होते आहे. ‘पिंगा’ या गाण्यात बाजीरावांची पत्नी काशीबाई आणि प्रेमिका मस्तानी या दोघीही एकत्र नृत्य करताना दाखवल्या असून पेशव्यांच्या इतिहासात असा कुठलाही संदर्भ नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली पेशव्यांच्या इतिहासात फेरफार करण्याचा अधिकार भन्साळींना कुणी दिला, असा सवाल करण्यात येत असून, या चित्रपटावर टीकेची झोड उठली आहे.
नुकताचं या चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आला. अगदी रॉयल पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या ट्रेलर लॉन्चला दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग उपस्थित होते. तर प्रियांका चोप्रा स्काइपवरून लाईव्ह होती. यावेळी चित्रपटातील काशीबाईंच्या भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीविषयी सांगताना प्रियांका भावूक झाली होती. तेव्हा ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने पेशव्यांनी चित्रपटाविरोधात लिहलेल्या खुल्या पत्राविषयी संपूर्ण टीमला प्रश्न केला. यावर दीपिका आणि रणवीरने मौन धारण केले. पण, प्रियांकाने याबाबत कोणतेही मौन बाळगले नाही. तिने उलट पेशवे कुटुंबियांना एक हृदयस्पर्शी संदेश दिला. ती म्हणाली की, या चित्रपटात इतिहासाचा एक भाग दाखविण्यात आलेला आहे. ना. स. इनामदारांच्या ‘राऊ’ या कादंबरीवर हा चित्रपट बेतला असून, त्यात बाजीराव-मस्तानीच्या प्रेमकथेत काय घडले याचाही समावेश आहे. इतिहासातील कथेचे सुंदर चित्रण चित्रपटातून करण्यात आले आहे, या दृष्टिकोनातून तुम्ही बाजीराव मस्तानी चित्रपटाकडे बघा आणि बाकी काहीही विचार करू नका.
दीपिका-प्रियांकावर चित्रित करण्यात आलेल्या पिंगा गाणे पाहता चित्रपटात तत्कालीन सांस्कृतिक संदर्भ आणि कथेचे विकृत चित्रीकरण करण्यात आले असल्याची टीका प्रसादराव पेशवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली होती.