बॉलीवूडमधील कंपूशाही आणि तेथील राजकारण याबद्दल अनेक वेळा बोलले गेले आहे. खास करून चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना इथे काम करण्यासाठी येणाऱ्या नवोदितांना या कंपूशाहीचा अनेकदा फटका बसला आहे. दरम्यान, आपल्यालाही बॉलीवूडने एकटे पाडले होते, असे सांगत हॉलीवूडमध्ये अभिनेत्री म्हणून आपले स्थान बळकट करणाऱ्या प्रियांका चोप्राने सगळय़ांनाच धक्का दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रियांका ‘सिटाडेल’ या प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणाऱ्या आगामी वेब मालिकेच्या प्रसिद्धी कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतात आली आहे. या मालिकेतील तिचा सहकलाकार रिचर्ड मॅडेनबरोबर प्रियांकाने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बॉलीवूडपासून दीर्घकाळ लांब राहण्याचे कारण तिला विचारण्यात आले. मध्यंतरी एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तिने बॉलीवूडमध्ये आपल्याला कशा पद्धतीने सापत्न वागणूक मिळाली होती याबद्दल मोकळेपणाने सांगितले होते. काम मिळत नव्हते. इथल्या राजकारणाला कंटाळले होते. हॉलीवूडमध्ये जेव्हा गायनाची संधी मिळाली तेव्हा मी या सगळय़ातून बाहेर पडण्यासाठी तिथे जाण्याचा निर्णय घेतला, असेही तिने सांगितले होते. मुंबईत झालेल्या ‘सिटाडेल’च्या पत्रकार परिषदेत अनेकांनी प्रियांकाच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक केले. मात्र तिने इतकी वर्षे यावर मौन का बाळगले, असाही प्रश्न तिला विचारण्यात आला.

‘‘पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मला माझ्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी विचारण्यात आले होते. मला तरुणपणात आणि त्यानंतर ३०, ४० अशा वयाच्या वेगवेगळय़ा टप्प्यांवर मला जे अनुभव आले त्याविषयी मी तिथे बोलले. एक तर मी माझ्या आयुष्याविषयी खरे अनुभव सांगत होते आणि आता या टप्प्यावर जे खरे आहे ते सांगण्याइतका आत्मविश्वास माझ्याकडे आहे’’, असे प्रियांका म्हणाली. त्यावेळी जे घडले त्याबद्दल माझ्या मनात एकच गोंधळ होता. त्या गोष्टी मागे टाकून आता माझ्या कारकीर्दीत मी खूप पुढे आले आहे. त्यामुळे मला वाटते मी आता त्याविषयी अधिक खुलेपणाने आणि स्पष्ट बोलू शकते, असेही तिने सांगितले. प्रियांकाच्या या मुलाखतीनंतर दिग्दर्शक अपूर्व असरानीनेही प्रियांकाने जे सांगितले ते खरे असल्याचे एका मुलाखतीत सांगितले. एखाद्या अभिनेत्रीने ठरावीक दिग्दर्शक, कलाकार यांच्याबरोबर काम करायला नकार दिला, तर पुढच्या वेळी तिला काम दिले जात नाही. इतकेच नाही तर संबंधित निर्माते वा कलाकार-दिग्दर्शक चित्रपटसृष्टीतील आपल्या जवळच्या निर्मात्यांना-दिग्दर्शकांनाही संबंधित कलाकाराविषयी सांगतात, असे अपूर्व असरानी यांनी सांगितले. अशाच पद्धतीने २०१२ मध्ये प्रियांकाच्या विरोधातही बॉलीवूडमधील काही लोकांनी मोहीम सुरू केली होती. तिला एकटे पाडण्यात आले होते, तिला चांगल्या भूमिका दिल्या जात नव्हत्या, असे सांगत असरानी यांनी प्रियांकाच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

करण जोहरचीही कबुली..

प्रियांकाने बॉलीवूडमधील आपला अनुभव कथन केल्यानंतर अनेक गोष्टी पुढे आल्या. यात अर्थातच ‘दोस्ताना २’मधून बाहेर पडल्यानंतक कार्तिक आर्यनला धर्मा प्रॉडक्शनकडून मिळालेल्या कानपिचक्या.. आणि या कशालाही न बधता कार्तिकने आपल्या आवडीने-निवडीने चित्रपट स्वीकारत घडवलेली कारकीर्द याचा उल्लेख झाला. तसंच सलमान खानने गायक अरिजित सिंगला दिलेल्या धमकीच्याही आठवणी निघाल्या. मात्र या सगळय़ा गर्दीत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी होता तो म्हणजे करण जोहर. २०१६ च्या मामि चित्रपट महोत्सवात खुद्द करण जोहरनेच कशा पद्धतीने आपण अभिनेत्री अनुष्का शर्माची कारकीर्द सुरू होण्याआधीच संपवायला निघालो होतो याचा किस्सा सांगितला. दिग्दर्शक आदित्य चोप्राने त्याच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटासाठी नायिका म्हणून अनुष्काची निवड केली होती. त्याने करण जोहरला तिची छायाचित्रेही दाखवली होती. मात्र करणच्या डोक्यात त्यावेळी सोनम कपूरचे नाव घोळत होतो. त्याने आदित्यला अनुष्काला नायिका म्हणून संधी देऊ नकोस, असे सांगण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र आदित्य चोप्रा आपल्या निर्णयावर ठाम होता. पुढे यशराजच्याच ‘बॅण्ड बाजा बरात’ या चित्रपटात अनुष्का पुन्हा एकदा झळकली. त्यावेळी तिचे काम आपल्याला प्रचंड आवडले आणि म्हणून तिची माफी मागावी, असेही आपल्याला वाटल्याचे करणने सांगितले होते. करणचा हा जुना व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला असून त्याच्यावर अनेकांकडून टीका होते आहे.

आपल्याला बॉलीवूडने एकटे पाडले होते. काम मिळत नव्हते. इथल्या राजकारणाला कंटाळले होते. हॉलीवूडमध्ये जेव्हा गायनाची संधी मिळाली तेव्हा मी या सगळय़ातून बाहेर पडण्यासाठी तिथे जाण्याचा निर्णय घेतला.

-प्रियांका चोप्रा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra statement that bollywood had left me alone amy
Show comments