बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ‘बेवॉच’ या हॉलीवूडपटात काम करणार असल्याचे निश्चित झाले आहे. यानिमित्ताने प्रियांका पहिल्यांदाच हॉलीवूड चित्रपटात काम करणार आहे. विशेष म्हणजे या पहिल्याच चित्रपटात प्रियांका ड्वेन जॉन्सन आणि झॅक इफ्रॉन या हॉलीवूड स्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. या चित्रपटाचे लेखक डॅमियन शॅनन आणि मार्क स्विफ्ट यांनी ट्विट करून प्रियांका ‘बेवॉच’मध्ये काम करणार असल्याची माहिती दिली. नव्वदीच्या दशकात टेलिव्हिजनवर आलेली ‘बेवॉच’ ही मालिका अमेरिकेसह जगभरात चांगलीच गाजली होती. दिग्दर्शक सेठ गॉर्डन या मालिकेवर आधारित चित्रपट तयार करत असून थोड्याच दिवसांत ‘बेवॉच’च्या चित्रीकरणाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी प्रियांकाने ‘क्वांटिको’ या अमेरिकन टेलिव्हिजनवरील मालिकेसाठी मानाचा ‘पीपल्स चॉईस अॅवॉर्ड’ पटकावला होता. अमेरिकेतील ‘क्वांटिको’ टीव्ही मालिकेतील एफबीआय एजंटच्या भूमिकेसाठी ‘पीपल्स चॉईस अॅवॉर्ड’ पुरस्कार पटकावणारी प्रियांका ही पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली आहे. प्रियांकाने इमा रॉबर्ट्स, जॅमी ली कर्टिस, ली मिशेल आणि मार्सिया गे हार्डेन यांसारख्या मातब्बर अभिनेत्रींना मागे टाकत या पुरस्कारावर आपले नाव कोरले.
Been sitting on this one for a while. So excited about her! https://t.co/qxOHgYcZBH
— Shannon and Swift (@shannonandswift) January 12, 2016