बॉलीवूडमध्ये बिनधास्त आणि बोल्ड अशी इमेज असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता चक्क नऊवारी साडीमध्ये पाहायला मिळणार आहे. अस्सल महाराष्ट्रीय संस्कृतीचा पेहराव/वेशभूषा म्हणून नऊवारी सोडी ओळखली जाते. बॉलीवूडमध्ये सध्या चर्चेत असलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ या आगामी चित्रपटात प्रियांका ८५ नऊवारी साडय़ा नेसणार आहे.
चित्रपटाचा मोठा पडदा ते दूरचित्र वाहिन्यांचा छोटा पडदा, संगीत अशा वेगवेगळ्या क्षेत्रात प्रियांका चोप्राने आपली स्वत:ची छाप उमटविली आहे. संजय लीला भन्साळीच्या आगामी ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात प्रियांका ‘काशिबाई’ ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. ‘डॉन’, ‘व्हॉट्स युवर राशी’, ‘सात खून माफ’ आदी तद्दन व्यावसायिक चित्रपट करणाऱ्या प्रियांकाने ‘बर्फी’, ‘मेरी कोम’ असे वेगळ्या धाटणीचे चित्रपटही केले आहेत. ‘बाजीराव मस्तानी’मधील तिची ‘काशिबाई’ची भूमिकाही तिच्या आजवरच्या भूमिकेपेक्षा वेगळी ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व असलेल्या पेशवे कुळातील बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्यावर हा चित्रपट आहे. चित्रपटात महाराष्ट्रीय व्यक्तिरेखा असल्याने चित्रपटातून महाराष्ट्रीय संस्कृती आणि वेशभूषा यांचे दर्शन घडणार आहे. अनुज मोदी हे प्रियांकाची वेशभूषा करत आहेत.
चित्रपटाच्या निमित्ताने प्रियांकाने महाराष्ट्रातील अिजठा-वेरुळ लेणी, पैठण, पुण्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालय आदी ठिकाणी भेटी दिल्या आहेत. महाराष्ट्रीय संस्कृती आणि पेहेराव याचा विशेष अभ्यासही ती करत आहे. या चित्रपटात रणबीर सिंह ‘बाजीराव’ तर दीपिका पदुकोण ‘मस्तानी’च्या भूमिकेत आहेत.
बिनधास्त आणि बोल्ड म्हणून माहिती असणाऱ्या प्रियांकाच्या ‘काशिबाई’ भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान प्रियांकाने वेगवेगळ्या प्रकारातील आणि रंगातील चार-सहा नव्हे तर ८५ नऊवारी साडय़ा नेसल्या असल्याचे सांगण्यात येते.
प्रियांका चोप्रा नऊवारीत..
बॉलीवूडमध्ये सध्या चर्चेत असलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ या आगामी चित्रपटात प्रियांका ८५ नऊवारी साडय़ा नेसणार आहे.
First published on: 19-04-2015 at 10:43 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra to wear 85 nauvari sarees for bajirao mastani