हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘नंबर वन’ची तारका याचे कोष्टक मांडताना दीपिका पदुकोण, कतरिना कैफ व विद्या बालन या तिघींभोवतीच ‘चर्चेची फेरी’ रंगते, पण विविधतेचा विचार केलात तर प्रियांका चोप्रा खूपच सरस ठरते, असे तुम्हाला वाटत नाही का?
‘अंदाज’ चित्रपटाद्वारे ती अभिनयाच्या क्षेत्रात आली तेव्हा तिला ग्लॅमरची प्रचंड हौस-मौज आहे असे ‘पिक्चर’ होते, पण जसजशी तिची कारकीर्द पुढे सरकली तशी ती आपल्या कामाबाबत खूप गंभीर आहे, असा प्रत्यय येऊ लागला व हेच महत्त्वाचे असते. त्यातच त्या कलाकाराची मॅच्युरिटी स्पष्ट होते.
‘फॅशन’, ‘व्हॉट्स युवर राशी’, ‘सात खून माफ’, ‘बर्फी’ अशी केवढी तरी विविधता देत देत ती ‘मेरी कोम’पर्यंत आली आहे. मणिपूरच्या बॉक्सरच्या संघर्षमय कथेवर भूमिका साकारण्यापूर्वी ती प्रत्यक्ष मणिपूरला जाऊन आली, अशी मेहनत घेऊनच आपली विश्वासार्हता टिकवायची असते, स्थान दाखवून द्यायचे असते. मध्येच ती ‘गुंडे’सारख्या चित्रपटातून भूमिका साकारते याचे आश्चर्य वाटू नये. काही वेळा व्यवसायाचा भाग म्हणून आणि कामातला तणाव हलका करण्यासाठी अशा मसालेदार मनोरंजक चित्रपटातून भूमिका साकारावी लागतेच. त्याकडे थोडं दुर्लक्ष करीतच तिच्या विविधतेचे कौतुक करूया ना? त्यामुळे चित्रपट या माध्यम व व्यवसायाकडे थोडे गांभीर्याने पाहता येईल..