स्वत:च अभिनय करत असलेल्या चित्रपटातील गाण्याला स्वत:चाच आवाज देण्याची उदाहरणे काही कमी नाहीत. अमिताभ बच्चन ते जुही चावलापर्यंत सर्वानी हा प्रयोग करून पाहिला आहे. आता त्यात प्रियांका चोप्राची भर पडली आहे. ‘मेरी कोम’ या आगामी चित्रपटात तिने गाणे गायले आहे.
बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अमिताभ बच्चन, गोविंदा, आमिर खान आदींनी गाणी गायली आहेत. अभिनेत्रीही त्यात मागे नाहीत. श्रीदेवीने ‘चाँदनी’ चित्रपटात गायलेले ‘चांदनी ओ मेरी चांदनी’ अजूनही श्रवणीय वाटते. माधुरी दीक्षितनेही ‘देवदास’ चित्रपटातील एका गाण्याच्या माध्यमातून स्वत:च्या आवाजाची झलक दाखवली होती. जुही चावलाने अलीकडेच आलेल्या ‘भूतनाथ’ चित्रपटात अमिताभ यांच्याबरोबर ‘चलो जाने दो अब छोडो भी’ हे गाणे गायले. आता प्रियांकानेही स्वतच्या आवाजाची झलक दाखवण्याचे ठरवले आहे. ‘माय सिटी’ हा प्रियांकाने गायलेल्या गाण्यांचा पहिला आल्बम परदेशात प्रकाशित झाला. त्यानंतर आतापर्यंत तिचे ‘एग्झॉटिक’ व ‘आय कान्ट मेक यु लव्ह मी’ हे अल्बम प्रकाशित झाले आहेत. आता ‘मेरी कोम’ या चित्रपटातील एक गाणे तिने गायले आहे. प्रियांकाच्या आधीच अलिया भट्ट हिने ‘हायवे’ आणि ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या दोन चित्रपटात गाणी गाऊन आपल्या आवाजाची चुणूक दाखवली आहे. श्रद्धा कपूरने ‘आशिकी २’ मध्ये गायिकेच्या भूमिकेत होती. तिनेही ‘एक व्हिलन’ या चित्रपटात गाणे गायले असून आगामी ‘हैदर’ या चित्रपटातही तिने गाणे गायले आहे. अभिनेत्री श्रुती हसनसुद्धा ‘गायिका’ झाली आहे. त्यामुळे अभिनयाबरोबरच गात्या गळ्याचीही चुणूक या अभिनेत्रींना द्यावी लागणार आहे.
‘मेरी’ आवाज सुनो!
स्वत:च अभिनय करत असलेल्या चित्रपटातील गाण्याला स्वत:चाच आवाज देण्याची उदाहरणे काही कमी नाहीत.
First published on: 31-08-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra turns singer for mary kom