शाहरूख खान आणि ह्रतिक रोशन या दोघांचेही आपापल्या पत्नीबरोबर खटके उडण्यासाठी एकच व्यक्ती कारणीभूत ठरली होती ती म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा. ‘डॉन’ आणि ‘डॉन २’मध्ये काम करत असताना शाहरूख प्रियांकाच्या बुध्दिमत्तेवर (?) भाळला होता. त्याच्यावरून आत्तापर्यंत कधीही प्रेमप्रकरणाबद्दल न अडकलेल्या शाहरूखचे पत्नी गौरीबरोबर चांगलेच वाजले होते. त्याचवेळी प्रियांकाबरोबर ‘क्रिश’मध्ये काम करणाऱ्या ह्रतिकच्या घरातही याच वादळाने धूमशान घातले होते. मात्र, एसआरकेने गौरीची समजूत काढली आणि मग गपगुमान प्रियांकापासून दूर गेला. तिकडे ह्रतिकच्या घरातही सगळे आलबेल झाले होते. पण,  ‘क्रिश ३’च्या प्रदर्शनासाठी इथे-तिथे भटकणाऱ्या ह्रतिकच्या सरळ-साध्या आयुष्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. गेले काही दिवस ह्रतिक आणि सुझ्ॉन घटस्फोट घेणार, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. पण, त्यांच्या घटस्फ ोटाच्या चर्चामागचे नेमके कारण सापडलेले नाही. भरीस भर म्हणून ‘क्रिश ३’मध्येही ह्रतिकबरोबर प्रियांका मुख्य भूमिकेत असल्याने त्या चर्चामागे पुन्हा एकदा पिग्गी तर नाही ना..अशी शंका घेतली जाऊ लागली आहे. ह्रतिक आणि सुझ्ॉन हे शाळेपासूनचे मित्र. एकाच महाविद्यालयात शिकले आणि प्रेमात पडले. त्यांचा विवाह झाल्यापासून आजपर्यंत एकदाही ह्रतिकचे नाव कोणत्या अभिनेत्रीबरोबर जोडले गेले नव्हते. पण, प्रियांकाबरोबरच्या वाढत्या मैत्रीमुळे मात्र ह्रतिक वादात सापडला होता. त्यानंतर त्याने प्रियांकाबरोबर जास्त ‘इव्हेंट्स’ केले नाहीत. किंबहुना, ‘क्रिश ३’च्या प्रसिध्दीसाठीसुध्दा ह्रतिक आपल्या वडिलांबरोबरच फिरताना दिसतो आहे. त्याच्या चित्रपटातील दोन्ही अभिनेत्री सध्या प्रसिध्दी कार्यक्रमांपासून लांबच आहेत. तरीही केवळ सुझ्ॉन माहेरी गेल्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये वादविवाद झाल्याच्या चर्चाना पेव फुटले. या अफवेमुळे ह्रतिक इतका वैतागला आहे की त्याने सरळ सरळ ट्विटरवर असंतोष व्यक्त केला. लोकांच्या या चर्चाना मी उत्तरे का देऊ?, असा उलट प्रश्न ह्रतिकने केला आहे. लहानपणी लोक माझ्या वडिलांचे टक्कल पाहून चिडवायचे तेव्हा सुरुवातीला मला त्यांचा राग यायचा. पण, नंतर मी माझ्या मनाला बजावले की माझे वडील माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. मग मी लोकांच्या मताला का भाव देऊ? आत्ताही मी तीच भूमिका घेणार असल्याचे ह्रतिकने स्पष्ट केले आहे. (म्हणजे वडिलांच्या चालीवर माझी सुझ्ॉन ही जगातील सर्वात सुंदर स्त्री आहे, अशी भूमिका घेणार!) ह्रतिकच्या या स्पष्टीकरणानंतर घटस्फोटाची अफवा शांत झाली असली तरी ही अफवा मुळात जन्मली कशी ते मात्र अद्याप कुणाला कळलेले नाही! हृतिक सध्या त्याचाच शोध घेत फिरतो आहे म्हणतात!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा