अनुराग बासू दिग्दर्शित ‘बर्फी’ या चित्रपटाने यावर्षीचे जवळपास सर्व पुरस्कार आपल्या खिशात टाकले. ‘बर्फी’च्या मुख्य भूमिकेसाठी रणबीर कपूर आणि ‘झिलमिल’च्या भूमिकेसाठी प्रियांका चोप्रा दोघांनाही पुरस्कार मिळाले. अगदी ऑस्करच्या स्पर्धेसाठीही चित्रपटाची रवानगी झाली. मात्र, एवढे कोडकौतुक होऊनही राष्ट्रीय पुरस्कारांसाठी या चित्रपटाची दखलही घेण्यात आली नाही, याबद्दल प्रियांका चोप्राने नाराजी व्यक्त केली.
‘बबली बदमाष’ या तिच्या पहिल्या आयटम सॉंगचे प्रकाशन करण्यात आले त्यानिमित्ताने तिने प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना ही खंत व्यक्त केली. ‘बर्फी’ला एकाही विभागात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही याबद्दल अत्यंत वाईट वाटले. अर्थात, या चित्रपटाला पुरस्कार का दिले नाहीत यासाठी परीक्षकांकडे निश्चित कारणेही असतील. पण, ही खंत नक्कीच आहे, असे प्रियांकाने सांगितले. ‘बर्फी’ या हलक्याफुलक्या चित्रपटात रणबीर क पूरने मूकबधीर तरूणाची तर प्रियांकाने गतिमंद मुलीची भूमिका साकारली होती. एकीकडे ‘बर्फी’ला पुरस्कार न मिळाल्याने नाराज झालेली प्रियांका आपली चुलत बहिण परिणीती चोप्रा हिला ‘इश्कजादें’ या चित्रपटासाठी विशेष पुरस्कार मिळाल्याने आनंदित झाली आहे. ‘चोप्रा कुटुंबात आता दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत. अर्थात, त्यासाठी दिवसभर मला घरच्यांना हा विशेष दखल घेतल्याचा पुरस्कार म्हणजे काय हे समजावण्यात गेला’, अशी मिश्कील टिप्पणीही तिने केली. प्रियांकाला याआधी मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘फॅशन’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा