बॉलिवूडमधलं आणखी एक सर्वात मोठं लग्न पुढील महिन्यात पार पडणार आहे. अर्थात हे लग्न असणार आहे बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचं. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या पाच दिवसामध्ये निक-प्रियांकाचा विवाहसोहळा रंगणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यासाठी ‘फॉरेनच्या जावईबापूचं’ भारतात आगमन झालं आहे. प्रियांकानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर निकसोबतचा फोटो शेअर करत भारतात त्याचं स्वागत केलं आहे. प्रियांका सध्या ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. सध्या दिल्लीमध्ये याचं चित्रीकरण सुरू आहे. म्हणूनच निकनं पहिल्यांदा दिल्लीत प्रियांकाची भेट घेतली. लवकरच हे जोडपं मुंबईत परतणार आहे.
पारंपरिक भारतीय पद्धतीनं निक प्रियांकाचा विवाहसोहळा रंगणार आहे. राजस्थानमधील जोधपूर येथील आलिशान उम्मेद भवनमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. या लग्नासाठी निकचं कुटुंब पुढील आठवड्यात भारतात दाखल होणार असल्याचंही समजत आहे. पारंपरिक भारतीय पद्धतीबरोबरच ख्रिश्चनपद्धतीनंही प्रियांका निकचं लग्न होणार असल्याचं समजत आहे. या सोहळ्यासाठी बॉलिवूड आणि निकचा मनोरंजन विश्वातील मित्रपरिवारही उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.