हॉलिवूडपट करण्याची महत्वाकांक्षा बाळगून असलेली प्रियांका सध्या बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम हिच्या जीवनावर आधारित चरित्रपटात काम करते आहे. मात्र, खुद्द स्वत:वरच्याच चरित्रपटाला सामोरे जाण्याची वेळ प्रियांकावर आली आहे. प्रियांकाचा माजी प्रियकर असीम मर्चंट या चरित्रपटाची निर्मिती करणार आहे. प्रियांकाला हा चरित्रपट मान्य आहे की नाही याची पर्वा न करता, ‘आम्हाला तिचा अभिमानच वाटतो’ अशी साखरपेरणी करत चरित्रपटाची गोळी असीमने तिच्या गळी उतरवायचा प्रयत्न सुरू केला आहे. तर प्रियांकाने मात्र त्याबद्दल जाहीर राग व्यक्त केला आहे. एरव्ही जगाला शहाणपणा शिकवणाऱ्या प्रियांकाला आता तिच्याच भूतकाळातील कटू आठवणींना पडद्यावर पहावे लागणार आहे. असीमने स्वत:ची लाईमलाईट प्रॉडक्शन नावाची निर्मितीसंस्था सुरू केली आहे. या बॅनरखाली बनवल्या जाणाऱ्या पहिल्याच चित्रपटात प्रियांकाच्या बॉलिवूडमधील सुरूवातीच्या दिवसांची, तिच्या त्या काळातील संघर्षांची कहाणी असणार आहे. मात्र, हा चित्रपट थेट प्रियांकावर नव्हे तर तिचा माजी व्यवस्थापक प्रकाश जाजू याच्या जीवनावर आधारित आहे, असा दावा असीमने केला आहे. प्रियांकाला बॉलिवूडमध्ये चित्रपट मिळवून देण्यात प्रकाश जाजू याचा मोलाचा वाटा होता. प्रियांका, प्रकाश जाजू आणि असीम र्मचट अशी तिकडी तेव्हा एकत्र काम करत होती. मात्र, बॉलिवूडमध्ये चांगले यश मिळाल्यानंतर अचानक प्रियांका आणि जाजू यांच्यात खटके उडायला सुरूवात झाली होती. प्रियांका आपल्याला फार मोठी रक्कम देणे लागते. पण, ती पैसे देण्यास टाळाटाळ करते आहे, असे जाजू यांचे म्हणणे होते. शेवटी हा वाद इतका टोकाला गेला की जाजूने तिच्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ सुरू करण्यास सुरूवात केली. तेव्हा प्रियांकाचे वडील अशोक चोप्रा यांनी जाजूविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि त्याची परिणती जाजूच्या तुरूंगवासात झाली. हा सगळा इतिहास आपल्या चित्रपटात असल्याचे असीमने म्हटले आहे. या चित्रपटामुळे प्रियांका नाराज होणार नाही का?, यावर माझे आणि प्रियांकाचे फार वर्षांचे चांगले संबंध आहेत. आणि मी चित्रपट बनवण्यासाठी ही संस्था सुरू केली आहे त्यामुळे तिच्या नाराजीचा प्रश्न येत नाही. प्रियांका खूप प्रेमळ आहे आणि मला तिचा अभिमान वाटतो, इत्यादी इत्यादी स्तुतीसुमनेही त्याने उधळली आहेत. मात्र, चित्रपटाचे कथानक पाहता असीमचा हेतू नक्कीच वेगळा असल्याचे स्पष्ट होते.

Story img Loader