खुलेआम द्वय़र्थी गाण्यांचे बोल पाहणाऱ्याला-ऐकणाऱ्याला कर्ण व नेत्रबधिर होण्याची शिक्षा देत असणाऱ्या काळात आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचे ‘बबली बदमाश’ हे आगामी चित्रपटातील आयटम साँग ‘फक्त प्रौढांसाठी’ गटात टाकणाऱ्या सेन्सॉर बोर्डाने आता ते ‘सर्वासाठी’ असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.
झाले काय?
दिल्ली येथील महिला कार्यकर्त्यांनी या गाण्यातील मादक दृश्यांवर आक्षेप घेतल्यामुळे सेण्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (सीबीएफसी) गाण्याला ‘ए’ (फक्त प्रौढांसाठी) प्रमाणपत्र दिले होते. मात्र या गाण्याबद्दल माध्यमांतील प्रतिक्रियांवरून आता हे गाणे ‘यूए’ प्रमाणपत्रासह सर्वासाठी असेल. फक्त १२ वर्षांखालील लहान मुलांनी आपल्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली हे गाणे अनुभवावे, असा सल्ला या प्रमाणपत्राद्वारे सेन्सॉर बोर्डाने दिला आहे.
नवे काय?
सेन्सॉर बोर्डाच्या पुनर्आढावा समितीने या गाण्याला ‘यूए’ प्रमाणपत्र दिल्याचे, बालाजी मोशन पिक्चर्सने म्हटले आहे. ‘आयटम साँग’ असल्यामुळे ‘बबली बदमाश’ला ‘ए’ सर्टिफिकेट देण्यात आले होते. त्यानंतर फिर्यादी आणि सेन्सॉर बोर्डामध्ये झालेल्या चर्चेनंतर गाण्याला ‘यूए’ प्रमाणपत्र देण्यात आले, असे बालाजी फिल्मचे तनगज गर्ग यांनी स्पष्ट केले. एखाद्या गाण्याच्या प्रदर्शनावर बंधने आणणारा कुठलाच नियम नसल्यामुळे या गाण्याला सर्वासाठीचे द्वार खुले झाले.
गाण्यात काय?
प्रियांका चोप्रा ‘बबली बदमाश’ या गाण्यामध्ये चामडय़ाची वस्त्रे लेवून दाखल झाली आहे. त्या वस्त्रांवर तिने चमकदार दिवेही लावले आहेत. अमिताभ बच्चन यांनी याराना चित्रपटामधील ‘सारा जमाना’ गाण्यामध्ये घातलेल्या वस्त्रांशी प्रियांका चोप्राची गाण्यातील वस्त्रे मिळतीजुळती आहेत. ‘शूट आऊट अ‍ॅट वडाला’ या चित्रपटामध्ये हे गाणे दिसणार आहे.

Story img Loader