अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर अनेकांनी चित्रपट दिग्दर्शक करण जोहर याच्यावर घराणेशाहीचा आरोप केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून करण सतत चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्येच अभिनेता अक्षय कुमार याच्या आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटातून करण जोहरचं नाव हटविल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याविषयी प्रसिद्ध चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन सत्य परिस्थिती सांगितली आहे.
‘सूर्यवंशी’ या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत असून सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याला अनेकांनी ट्रोल केलं आहे. म्हणूनच या चित्रपटाच्या श्रेयनामावलीतून करण जोहरचं नाव हटविल्याची चर्चा सुरु होती. परंतु, या चर्चांना काही अर्थ नसून त्याचं नाव या श्रेयनामावलीत असल्याचं तरण आदर्श यांनी सांगितलं आहे.
IMPORTANT… News doing the rounds of #KaranJohar not being part of #Sooryavanshi is untrue, clarifies #RelianceEntertainment. pic.twitter.com/0IT9qnNdyS
— taran adarsh (@taran_adarsh) July 1, 2020
”सूर्यवंशी’च्या श्रेयनामावलीतून करण जोहरचं नाव हटविल्याच्या ज्या चर्चा सुरु आहेत. त्या चुकीच्या आहेत. रिलायन्स एन्टरेन्मेंटकडून याविषयी खुलासादेखील करण्यात आला आहे”, असं ट्विट तरण आदर्श यांनी केलं आहे. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहर,सलमान खान यांच्यावर अनेकांनी घराणेशाहीचा आरोप केला आहे. तसंच दिवंगत अभिनेता इंदर कुमार याच्या पत्नीनेदेखील करण जोहरवर घराणेशाहीचा आरोप केला आहे.