अभिनेते प्रकाश राज यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक भाषांमध्ये उत्कृष्ट काम केलं आहे. अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, तसेच ते राजकारणातही सक्रिय आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना मोठा पराभव सहन करावा लागला होता.

नुकतंच प्रकाश राज यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि उदयनिधी स्टॅलिन यांचे वडील एम. के. स्टॅलिनदेखील होते. फोटोबरोबर प्रकाश राज यांनी लिहिलं, “With a Deputy CM… #justasking.”

हेही वाचा…करण जोहरवर ‘जिगरा’ सिनेमामुळे झाला घराणेशाहीचा आरोप, इन्स्टाग्रामवर मोठी पोस्ट लिहित म्हणाला, “मी हात जोडतो…. “

निर्माते एस. विनोद कुमार यांचे प्रकाश राज यांच्यावर आरोप

प्रकाश राज यांच्या ट्विटला प्रतिसाद देत निर्माता एस. विनोद कुमार यांनी प्रकाश राज यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं, “तुमच्यासोबत बसलेले बाकीचे तिघे निवडणुका जिंकले आहेत, परंतु तुम्ही निवडणुकीत हरलात आणि तुमचं डिपॉझिट जप्त झालं, एवढाच फरक आहे. तुम्ही माझ्या सेटवर एक कोटींचं नुकसान केलं, कारण तुम्ही कोणालाही न सांगता कारवॅनमधून गायब झालात! याचं कारण काय होतं?! #Justasking!!! तुम्ही मला कॉल करणार असल्याचं सांगितलं होतं, पण तुम्ही तो केला नाही!!”

प्रकाश राज यांनी या ट्विटला अद्याप कोणताही प्रतिसाद दिला नाही, मात्र सोशल मीडियावर हा वाद चांगलाच चर्चेत आहे. एस. विनोद कुमार कोणत्या चित्रपटाबद्दल बोलत आहेत, याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. प्रकाश राज आणि एस. विनोद कुमार यांनी यापूर्वी ‘एनिमी’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं, जो २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा…हार्दिक पंड्यापासून विभक्त झाल्यावर नताशाने केली पहिल्या प्रोजेक्टची घोषणा; नव्या गाण्यात झळकणार, कृणाल पंड्याच्या कमेंटने वेधलं लक्ष

प्रकाश राज यांनी ज्युनिअर एनटीआरच्या नुकत्याच आलेल्या ‘देवरा पार्ट १’ सिनेमात प्रमुख भूमिका केली आहे. आणि त्यानंतर ते राम चरणच्या ‘गेम चेंजर,’ सुरियाच्या ‘कांगुवा’ आणि थलापथी विजयच्या आगामी चित्रपटात दिसणार आहेत.