‘मी टू’ चळवळीनं बॉलिवूडमध्ये एक नवी क्रांती निर्माण केली आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं बळ या मोहिमेनं महिलांना दिलं. काही दिवसांपूर्वी फेसबुक पोस्टद्वारे आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या विनता नंदा यांनी आता थेट पंतप्रधान मोदींकडे न्याय मागितला आहे. विनता यांनी मोदींना सोशल मीडियावर पत्र लिहित लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या सर्व महिलांना मदत करण्याची विनंती केली आहे.
‘भारत हा देश महिलांसाठी नव्हेच असं सगळे जण म्हणतात पण या सगळ्यांना खोटं ठरवा. इथल्या प्रत्येक महिलेच्या पाठी तुम्ही खंबीरपणे उभे आहात हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे त्यामुळे तुम्ही पडितांना पाठिंबा द्या. त्यांना न्याय मिळवून द्या अशी विनंती विनता यांनी आपल्या पत्रातून मोदींना केली आहे.
‘मी टू सारख्या मोहिमेमुळे आम्हाला बळ मिळालं. खरं तर यापूर्वी आम्ही गप्प होतो. अत्याचार मुकपणे सहन करत होतो. पण आता अन्यायाला वाचा फोडण्याची ताकद मी टूनं समस्त महिलांना दिली. खऱ्या अर्थानं आम्हाला बदलाची गरज आहे, तेव्हा जो बदल आम्हाला अपेक्षित आहे त्या बदलासाठी साहाय्य करा, आम्हाला सुरक्षा पुरवा.’ असंही त्या आपल्या पत्रात म्हणाल्या आहेत.
Dear @narendramodi ji. We pray in #Navratri to #Durga who was worshipped by #Ram before defeating the evil #Ravana. As the custodian of truth at this point in time, help us get justice, which a legal system we inhabit does not provide us with tools to avail?
— VINTA NANDA (@vintananda) October 16, 2018
‘आज गरीबी आणि श्रीमंतीवरून माणसाची तुलना इथे केली जाते. ही पुरुषप्रधान संस्कृती आहे इथे बाईला तिचा हक्क नाकारला जातो असं म्हणतात पण महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रत्येकाला योग्य ती शिक्षा देऊन त्यांना खोटं ठरवा’ असं विनता यांनी आपल्या पत्रात मोदींना लिहिलं आहे.
‘आपण नवरात्रीत दुर्गेची पुजा करतो, रावणाचा वध करण्याआधी रामानं याच दुर्गेची पुजा केली होती. असत्याशी लढण्यासाठी त्या देवीनं रामाला ताकद दिली. आता या अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी तुम्ही आम्हाला साहाय्य करा’ अशी कळकळीची विनंती करत विनंता यांनी हे पत्र लिहिलं आहे. या पत्राची दखल घेऊन मोदींनी साहाय्य करावं अशी अपेक्षा त्यांनी ट्विटमधून केली आहे. ट्विटद्वारे त्यांनी या पत्रातील प्रत्येक मुद्दे मांडले आहेत.
विनता नंदा यांनी प्रसिद्ध अभिनेते आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. ९० च्या दशकातील गाजलेली मालिका ‘तारा’ च्या निर्मात्या होत्या. फेसबुक पोस्टनंतर आता विनता नंदा यांनी अभिनेता आलोकनाथ यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.