मराठी ग्रंथ संग्रहालय, हैदराबाद या संस्थेच्या वतीने संस्थेच्या मा. कार्यकारिणी उषा माईणकर स्मरणार्थ जनकवी कै. पी. सावळाराम यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम ‘कोकिळ कुहू-कुहू बोले’ सादर करण्यात आला. हा कार्यक्रम सत्येंद्र माईणकर कुटुंबीयांनी पुरस्कृत केला होता. २०१३-२०१४ वर्ष कवी, गीतकार कै. पी. सावळाराम यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष. परंतु काही कारणामुळे थोडाशा विलंबानेच हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. ग्रीष्माचा उष्मा संपून, सुरुवातीचा तुरळक पाऊस सुरू झाल्यामुळे वातावरण अत्यंत छान होते. संस्थेचा काशिनाथराव वैद्य हॉल तुडुंब भरला होता. जागेअभावी अनेक रसिकांना पायऱ्यांवर बसून, तर काहींना उभे राहूनच पी. सावळाराम यांच्या एकेकाळच्या अत्यंत लोकप्रिय गीतांचा आस्वाद घ्यावा लागला. पावसाची तमा न बाळगता रसिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथ संग्रहालयाचे कार्यवाह सतीश देशपांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विनय पाहणकर यांनी सरस्वती वंदना सादर करून कार्यक्रमाचा आरंभ केला.
संस्थेचे अध्यक्ष दिगंबरराव खळदकर आणि सत्येंद्र माईणकर व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने उषा माईणकर आणि जनकवी पी. सावळाराम यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. उषा माईणकर यांच्या सुकन्या डॉ. प्रथमा माईणकर यांनी मोजक्या शब्दात आईच्या स्मृतीस व आजीच्या स्मृतीस उजाळा दिला. या दरम्यान उषा माईणकर यांची माहिती स्क्रीनवर सादर करण्यात आली. पी. सावळाराम यांच्याच ‘ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता, भगवता लक्ष द्या हो, विनविते मराठी मी त्याची माता’ या गीतातील चार ओळी, सर्व गायक कलाकारांनी सादर करून कार्यक्रम सुरू केला. कविवर्याचा परिचय डॉ. नयना देशपांडे यांनी मोजक्या शब्दांत करून दिला. त्याच वेळी स्क्रीनवर पी. सावळाराम यांच्या जीवनातील ठळक घटना झळकत होत्या. बोलण्याच्या ओघात डॉ. नयना देशपांडे यांनी जनकवीने पी. सावळाराम नाव का धारण केले, हे सांगून इतर गीतांची पाश्र्वभूमी सांगितली व त्यानंतर एका पाठोपाठ एक अशा गीतांच्या लडी उलगडत गेल्या. भावगीत, भक्तिगीत, चित्रपटगीत, बालगीत, भूपाळी अशी वेगवेगळी गाणी ज्यांनी कधीच संगीतकार वसंत प्रभु, गीतकार पी. सावळाराम यांचे नावही ऐकले नाही, जी ५० वर्षांपूर्वी अत्यंत गाजली गेली, ती गाणी सर्व तरुण गायक कलाकारांनी अत्यंत उत्कटपणे सादर केली. कलाकार होते सायली मनसबदार, स्मुकीर्ती जोशी, कल्याणी गाजरे, नेहा शैलेंद्र आणि हेमांगी भगत नेने. विनय पाटणकरांनी ‘मानसीचा चित्रकार’ अत्यंत भावपूर्ण आवाजात सादर केले. सर्व रसिकांना त्या ‘अक्षय गाण्यांच्या’ काळात नेऊन पुनप्रत्ययाचा आनंद दिला. अक्षयगीते ऐकताना रसिक अतिशय मस्त अशी दाद देत होते. हैदराबादेतील शास्त्रीय गायक कलाकार सतीश अशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या कार्यक्रमास वादक कलाकारही अत्यंत कुशल लाभले. तबल्यावर रमेश कुलकर्णी व किशोरजी, संवादिनीवर विनय पाटणकर, सिंथेसायझरवर नंदकुमार कुलकर्णी आणि गुरुप्रसादजी यांची साथ होती, तर कार्यक्रमाचे निवेदन कांचन तुळजापूरकर व डॉ. नयना देशपांडे व प्रकाश फडणीस यांचे होते. दिलीप शतोळीकर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. ज्यापूर्वी सर्व गायक कलाकार व वाद्यवृंद तसेच मार्गदर्शक सतीश काशीकर या सर्वाचा ग्रंथालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यवाह सतीश देशपांडे यांनी जनकवी पी. सावळाराम यांचे चिरंजीव व संजय पाटील तसेच मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे यांचा या कार्यक्रमासाठी मिळालेल्या सहाय्याबद्दल कृतज्ञतेने उल्लेख केला. संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना सतीश देशपांडे यांची होती व त्यांना विशेष सहाय्य माधव चौसाळकर, प्रभाकर कोरडे यांचे लाभले.
भगिनी समाज – अहमदाबाद
नवीन कार्यकारी मंडळ
विश्वस्त – १) रोहिणी जोशी २) आश्लेषा देशपांडे ३) उषा कान्हेरे, अध्यक्ष – संध्या थिटे, उपाध्यक्ष – प्रतिभा लेले, सेक्रेटरी – चारुशीला घटावकर, सहसेक्रेटरी – संगीता भागवत, खजिनदार – पूनमचंद नांदोडे, कार्यकारी सभासद – १) निशा पोतनीस २) ज्योती अहिरराव ३) मंगल पेंढारकर ४) सुप्रिया देशपांडे ५) किरण सोनी ६) जयश्री सोनी ७) शेवडे ८) ज्योती देशपांडे ९) सुनीता चौधरी, भगिनी समाजाच्या २९ एप्रिल २०१५ च्या सर्वसाधारण सभेत वरील कार्यकारी मंडळ नक्की करण्यात आले. विश्वस्तांची नेमणूक पाच वर्षांसाठी आहे.
अहमदाबाद येथे वटपौर्णिमेचा उत्सव
(आश्लेषा अतुल देशपांडे)
भगिनी समाज भद्र येथे वटपौर्णिमेचा उत्सव खूप आंनदात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम उपस्थित सर्व भगिनींनी पंचपदी म्हटली. चारुशीला ढाटावकर यांनी पोथीवाचन केले. शोडषोपचारे पूजाही झाली. सर्व भगिनींनी आणलेल्या फळांचा नवेद्य दाखवला गेला. नंतर हळदीकुंकू समारंभही छान पार पडला. साबुदाणा खिचडी व कॉफी होऊन या सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती.
रेखा गणेश दिघे

Story img Loader