गणेशोत्सव, जवळपास सर्वाच्याच आपुलकीचा सण. गणपती म्हणजे ६४ कलांचा अधिपती. त्यामुळेच गणेशोत्सवामध्ये बऱ्याच कलांना वाव दिला जातो. नाटकामध्ये काम करणारी बरीच मंडळी या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांमधून पुढे आलेली पाहायला मिळतील.
भाऊ कदम आणि सागर कारंडे, हे सध्या भन्नाट फॉर्मात असलेल्या अभिनेत्यांचा नाटकाचा श्रीगणेशाही गणेशोत्सवामध्येच झाला. मी एकदम बुजरा होतो. कधी कुणाशी थेटपणे बोलायचो नाही. किंवा जास्त लोकांसमोर बोलायला भीती वाटायची. तेव्हा मी नाटकांमध्ये काम करेन, असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण गणेशोत्सवांतील कार्यक्रमांमुळे मला लोकांसमोर धीटपणे काम करायचे शिकता आले. लहानपणी चाळीत असताना आम्ही सारेच गणेशोत्सवाची वाट पाहायचो. कारण तो एकच सण आम्हाला बरंच काही देऊन जायचा. चाळीतल्या गणेशोत्सवामध्ये मी पहिल्यांदा ‘स्टेज’वर गेलो. एकपात्री प्रयोग करायचा होता. त्या वेळी काही दिवस पाठांतरही केलं होतं. ‘स्टेज’ गेलो तेव्हा तिथे प्लॅस्टर ऑफ पॅरिस पडलेलं होतं. पण त्याची तमा न बाळगता, अंग काहीसं पांढऱ्या रंगाचं झालं तरी मी एकपात्र प्रयोग केला. त्यानंतर एकांकिकाही केल्या. त्या वेळी २५ रुपयांचं बक्षीस मिळालं होतं. ते माझं पहिलं बक्षीस. तिथून राज्य नाटय़ स्पर्धा आणि त्यानंतर व्यावसायिक नाटक असा माझा प्रवास घडला. पण जर गणेशोत्सवामध्ये जर नाटक केलं नसतं, तर मी या क्षेत्रात नसतो, असं गणेशोत्वसाचं आपल्या कारकीर्दीतलं योगदान भाऊ सांगत होता.
गणेशोत्सव म्हणजे आमच्यासाठी सर्वात आनंदाचा सण. गणेशोत्सवामधील नाटकांसाठी आम्ही वर्षभर तालीम करायचो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाटय़गृहामध्ये प्रेक्षक पैसे देऊन नाटक पाहण्यासाठी येतात आणि प्रत्येक क्षणाचा आनंद लुटतात. पण गणेशोत्सवामध्ये येणारा प्रेक्षक हा फक्त एक फेरी मारण्यासाठी आलेला असतो. त्याला जर ते नाटक आपलंस वाटलं नाही, तर तो नाटक सोडून जाऊ शकतो. त्यामुळे ‘त्या’ प्रेक्षकांना खिळवून ठेवणं, हे सर्वात मोठं आव्हान असतं. गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रेक्षकांना कसं आपलंस करता येईल, त्यांना नाटकांमध्ये कसं गुंतवून ठेवता येईल, प्रेक्षकांची नस कशी ओळखायची हे मी शिकलो, अशा गणेशोत्सवाच्या आठवणी सागरने सांगितल्या.
सागरचा एक गणेशोत्सवातला किस्साही अविस्मरणीय असाच. ‘आम्ही सातपुते’ या नाटकाचा प्रयोग महाराष्ट्रातील एका खेडय़ात गणेशोत्सवानिमित्त आयोजित केला होता. नाटक सुरू झाल्यावर काही वेळाने पावसाचे आगमन झाले. त्या वेळी साऱ्यांनाच चिंता होती की, हे सर्व प्रेक्षक पावसामुळे थांबणार नाहीत. पण नाटकाची ताकद एवढी होती, सर्व प्रेक्षकांनी छत्री उघडून स्वत:ला थोडेसे सावरले, पण नाटक पाहणे मात्र सोडले नाही.
लेखक-दिग्दर्शक संतोष पवारला एक खंत नेहमीच सलते, ती म्हणजे आपल्या भागामध्ये गणेशोत्सवामध्ये एकही प्रयोग न केल्याची. कारण त्याच्या नाटकांना गणेशोत्सवामध्ये एवढी मागणी असते की त्याला घरी जाणेही शक्य नसते. गणेशोत्सवातल्या नाटकाची एक अशीच आठवण त्यानेही सांगितली. गणेशोत्सवानिमित्त कोकणातील हर्णे गावामध्ये नाटकाचा प्रयोग होता. ते गाव अल्पसंख्याक असलं तरी त्यांना चांगलं मराठी समजत होतं. या नाटकात अफझल खान, असं एक पात्र होतं. पण त्या गावात अल्पसंख्याक असल्यामुळे त्याने ते पात्र दाखवण्याची जोखीम उचलली नाही. पण नाटक तर पुढे सरकायला हवंच. त्यासाठी एक शक्कल शोधून काढली. अफझल खानची दाढी तशीच ठेवली. संवादही तेच ठेवले. पण त्याचा अंगरखा काढला आणि त्या जागी उपरणं घातलं. त्याला हिरण्यकश्यपू बनवलं. संपूर्ण नाटक आम्ही तसंच पार पडलं, तिथल्या एकाही प्रेक्षकाला अखेपर्यंत हा बदल समजला नाही.
आतापर्यंत गणेशोत्सवाच्या माध्यमातून बरेच कलाकार रंगभूमीला मिळाले आहेत. त्यांच्या अभिनयाचा श्रीगणेशाच गणेशोत्सवात झाला आहे. पण गेल्या काही वर्षांपासून चाळीच फार कमी राहिल्या. सांस्कृतिक कार्यक्रमही रोडावले. त्यामुळे पूर्वीसारखी नाटकंही पाहायला मिळत नाहीत. सणांच्या झालेल्या ‘इव्हेंट’मध्ये नाटकांची परिस्थिती बेताचीच आहे, ती सुधारायला हवी हे मात्र नक्की.