लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्याच्या वादावरुन गौतमी पाटील हे नाव सातत्याने चर्चेत आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरुन ती चांगलीच चर्चेत आली होती. या सर्व प्रकरणानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी यावर टीका केली आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या गौतमी पाटीलवर निशाणा साधला.
सुरेखा पुणेकर यांनी नुकतंच ‘टीव्ही ९ मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना आताच्या लावणी कलाकारांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी गौतमी पाटीलचे नाव न घेता तिच्या लावणीबद्दल संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी इतर लावणी कलाकारांबद्दलही सांगितले आहे.
आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली
सुरेखा पुणेकर काय म्हणाल्या?
“जी लावणीसम्राज्ञी अंगविक्षेप करुन आपली कला सादर करते तिला लोकं सोडणार नाही. ज्या लावणी सम्राज्ञीकडे कला आहे, तिला प्रोत्साहन द्या. अपुरे कपडे घालणे आणि अश्लील वर्तन करुन नाचणे याला लावणी म्हणत नाहीत. लावणी कलेला योग्य प्रकारे सादर गेले केले पाहिजे. नाहीतर महिला स्टेजवर जाऊन मारतील. जी कलाकार चांगली आहे, तिला नक्कीच तुम्ही डोक्यावर घ्या, तिला प्रोत्साहन द्या. पण जी अश्लील वर्तन करते, जी अपुरे कपडे घालते, तिला तुम्ही समाजात अजिबातच स्थान देऊ नका. नाहीतर महाराष्ट्राचा देखील बिहार होईल”, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा : “ब्लाऊजचा गळा, कमरेखाली साडी अन् अंगविक्षेप…” मेघा घाडगेचा गौतमी पाटीलवर पुन्हा एकदा हल्लाबोल
“महाराष्ट्राचा बिहार होऊ न देणं हे प्रेक्षकांच्या हातात आहे. सध्या अनेक कलाकार असे करत आहे. मी कुणाचंही नाव घेणार नाही. पण या गोष्टी सर्रास घडताना दिसत आहेत. लावणी ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे. त्यामुळे तिला आपणच जपलं पाहिजे. त्याचं सादरीकरण चांगले असले पाहिजे.
आताच्या लावणी कलाकार हे अपुरे कपडे घालून, अश्लील हावभाव करुन नाचताना दिसत आहेत. आताच्या लावणी सम्राज्ञींनी अश्लील डान्स सोडून भान ठेवून वागण्याची गरज आहे. हे आम्ही कधीही सहन करणार नाही, आमच्या महाराष्ट्राच्या महिला नक्कीच तिला स्टेजवर येऊन मारतील. महाराष्ट्रात हे चालणार नाही. लावणी ही लोककला महाराष्ट्राची शान आहे. ती जपायला हवी”, असेही सुरेखा पुणेकर म्हणाल्या.