‘मन मोठं असलं, की सारं काही सामावून घेता येतं..’ हे वाक्य म्हणताच जान्हवीची प्रेक्षकांना पहिली ओळख होती. तिचं मन एवढं मोठं आहे की, तिला सहा सासवा आहेत.. हे तिच्याबरोबर एकत्र नाचणाऱ्या सहा बायका पाहिल्या, की आपल्या लक्षात येतं आणि मग अरे बाप रे! सहा-सहा सासवांना ही एकटी मुलगी कशी सांभाळणार.. टीव्हीच्या पडद्यासमोर बसलेल्या अनेकींच्या मनात हा प्रश्न खेळू लागतो. तो प्रोमो पाहिल्यानंतर क ोण आहे ही जान्हवी, तिला सहा सासू कशा काय असू शकतात? या सहा जणी आहेत तरी कोण.. अशा सगळ्या प्रश्नांच्या रिंगणासह ‘होणार सून मी या घरची’ची जान्हवी त्यांच्या मनात अगदी घट्ट रुतून बसते. मग कोणत्या तारखेला ही मालिका सुरू होतेय, याचीही नोंद कॅ लेंडरवर होते आणि आपसूकच पहिल्या भागापासून प्रेक्षक मालिकेशी जोडला जातो..
प्रेक्षकांना वाहिनीशी जोडणारा हा पहिला धागा म्हणजे ‘प्रोमो’ अशातऱ्हेने यशस्वीरीत्या जोडला जातो. याआधीही मालिकांची जाहिरात प्रोमोनेच व्हायची, पण मालिकेची तोंडओळख करून देणाऱ्या या प्रोमोचे स्वरूप आता पूर्णपणे बदलले आहे. सध्या या ‘प्रोमो’चा वापर एखाद्या जाहिरातीसारखा केला जातो आहे. तुम्हाला नव्या मालिकेत काय पाहायला मिळणार आहे, याची एक झलकच तुम्हाला प्रोमोमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे साहजिकच प्रोमो पसंत पडला तर प्रेक्षक मालिकेशी पहिल्यापासून जोडला जातो, किंबहुना त्याची उत्सुकता तरी चाळवली जाते. त्यामुळे हा प्रोमो बनवण्यासाठी सध्या लाखो रुपये वाहिन्यांकडून खर्च केले जात आहेत.
चित्रपटाच्या जाहिरातीसाठी प्रोमो बनवले जातात त्या धर्तीवर आता मालिकांसाठी स्वतंत्रपणे प्रोमो बनवले जाऊ लागले आहेत. सुरुवातीला वाहिन्यांमध्ये फारशी स्पर्धा नव्हती. त्यामुळे नवीन मालिका येणार असेल, तर त्या मालिकेच्या चित्रीकरणातलाच एखादा महत्त्वाचा भाग प्रोमोच्या स्वरूपात दाखवला जायचा. आता मात्र, प्रत्येक मालिकेचा केवळ प्रोमो बनवण्यासाठी वाहिन्यांनी स्वतंत्र टीम तयार केल्या आहेत. रिअ‍ॅलिटी शोसाठी ‘प्रोमो’ हे फार महत्त्वाचे ठरतात, त्यामुळे त्यांचे प्रोमो स्वतंत्रपणे चित्रित के ले जायचे, पण आता त्यातही एखादी संकल्पना घेऊन प्रोमो बनवण्यावर जास्त भर दिला जातो. सोनी वाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ने या वेगळ्या प्रोमोची सुरुवात केली होती. ‘केबीसी’च्या प्रत्येक पर्वासाठी वेगळी ‘कॅचलाइन’ घेऊन मग त्याच्याशी संबंधित कथा रचून प्रोमो केले जायचे. ‘सिर्फ ग्यान ही आपको आपका हक दिलाता है..’ असेल किंवा ‘कोई आदमी छोटा नही होता..’ असेल अशा अनेक संकल्पनांभोवती बांधलेले केबीसीचे प्रोमो प्रचंड हिट ठरले, त्यामुळे आता जवळपास सगळ्याच रिअ‍ॅलिटी शोसाठी काही भन्नाट संकल्पना घेऊन प्रोमो रचले जात आहेत. केबीसीचा मराठी अवतार असलेल्या ‘कोण होईल मराठी करोडपती’च्या जोडी स्पेशल पर्वासाठीही असेच खास प्रोमो तयार केले गेले आहेत, पण वेगळ्या प्रोमोची ही संकल्पना रिअ‍ॅलिटी शोपुरती मर्यादित न राहता सध्या मालिकांसाठी परिणामकारकरीत्या वापरली जाते आहे.
छोटय़ा पडद्याचे स्वरूप आणि मनोरंजनाचा दर्जा यात फार वेगाने बदल घडून आले आहेत. सध्या छोटय़ा पडद्यावर केवळ मालिका, केवळ चित्रपट, अ‍ॅनिमेशन मालिका दाखवणाऱ्या लहान मुलांच्या वाहिन्या, डिस्कव्हरीसारख्या माहिती आणि ज्ञान देणाऱ्या वाहिन्या अशा अनेकविध विषय हाताळणाऱ्या वाहिन्यांची एक जंत्रीच्या जंत्री तुम्हाला रिमोटच्या बटनांवर उपलब्ध आहे. या भाऊगर्दीत प्रेक्षकांना नेमकं आपल्या मालिकांपर्यंत खेचून आणण्यासाठी प्रोमोचा अगदी जाहिरातीसारखा वापर करावा लागतो आहे, अशी माहिती झी मराठीच्या क्रिएटिव्ह टीमने दिली. मालिकांचे प्रोमो आणि ‘टायटल मोन्टाज’ म्हणजे आधी केवळ मालिकांचे शीर्षकगीत सुरू व्हायचं त्या वेळी पडद्यावर कलाकार आणि तंत्रज्ञांची नावं दिसायची, पण आता ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ असेल, नाही तर ‘होणार सून मी या घरची’ मालिकेचे शीर्षकगीत असेल, त्याचेही चित्रीकरण केले जाते. मग ‘प्रेमाला प्रेमाने पाहू चला..’ म्हणत नाचणारा ओम आणि ईशा तरुणांना भुरळ घालतात किंवा ‘रोज रोज कसरत तारेवरची.. असं म्हणत नाचणारी जान्हवी पाहिली, की घरातली लहान मुलेही ठेका धरतात. हिंदीत ‘टायटल मोन्टाज’ हा प्रकार होता. ‘देख भाई देख’ किंवा ‘जबान संभाल के’ अशा काही मोजक्या मालिका आठवल्या, तर त्यांच्या सुरुवातीचं गाणं आजही आपल्या ओठावर येतं इतकं त्याचं प्रभावी चित्रण केलं गेलं होतं. शीर्षकगीत हे पहिल्यापासूनच झी मराठीचं वैशिष्टय़ राहिलं आहे, पण आता केवळ गाणं ऐकणं एवढय़ापुरतेच मर्यादित न राहता ते लोकांच्या आठवणीत राहील अशा पद्धतीने त्याची मांडणी करून चित्रीकरण केलं जातं, अशी माहिती झी मराठीच्या ‘टायटल मोन्टाज’चे काम पाहणाऱ्या टीमने दिली. हे प्रोमो मालिकेची निर्मिती करणाऱ्या प्रॉडक्शन संस्थांकडून बनवून घेतले जायचे. आता मात्र मालिकांच्या प्रसिद्धीची जबाबदारी ही वाहिन्यांकडून उचलली जाते, असे ‘कलर्स’ वाहिनीच्या सूत्रांनी सांगितले.
‘कलर्स’ वाहिनीवर सुरू झालेल्या ‘रंगरसिया’ आणि ‘बेइंतिहा’ या दोन नवीन मालिकांसाठी अशाच प्रकारे वेगळे प्रोमो बनवण्यात आले आहेत. ‘बेइंतिहा’ या मालिकेच्या प्रोमोत एकमेकांना पसंत न करणारे नायक-नायिका मनाविरुद्ध लग्नाच्या बेडीत अडकलेले दिसतात. प्रोमोत चित्रित झालेले दृश्य तसंच्या तसं तुम्हाला मालिकेत पाहायला मिळणार नाही, कारण ते प्रोमोसाठी स्वतंत्रपणे चित्रित केलं गेलं आहे. तीच गोष्ट सोनीवरच्या ‘मै ना भुलूंगी’ या नव्या मालिकेची. इथेही नुकतीच लग्न झालेली, सुखी संसाराच्या चित्रात हरवलेली शिखा आणि त्याच वेळी तिच्या पोटात सुरा खुपसणारा तिचा नवरा दिसतो आणि प्रोमोतूनच या मालिकेची कथा काय आहे हे आपल्याला झटक्यात कळतं. प्रत्यक्षात, हे दृश्य मालिकेत दिसणारे नाही. मालिका प्रसारित व्हायच्या एक महिना आधीपासून प्रोमोद्वारे मालिकेची जाहिरात केली जाते याचाच अर्थ प्रत्यक्ष मालिकेची सुरुवात होण्याआधी दोन महिने अगोदर प्रोमोच्या चित्रीकरणाला सुरुवात होते. मालिकेतील कथेचा सारांश काढून मग प्रोमोची संकल्पना तयार केली जाते, असे झी मराठीच्या टीमचे म्हणणे आहे. एखाद्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी जशी एक टीम संपूर्णपणे काम करते तशाच प्रकारे मालिका हे आपले उत्पादन आहे असे समजूनच वाहिन्यांची क्रिएटिव्ह टीम प्रोमोची निर्मिती करते. त्यामुळे एका जाहिरातीसाठी जो खर्च येतो तोच प्रोमोच्या निर्मितीसाठीही होतो, पण अशा प्रोमोमधून मालिकांचे विषय थेटपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. काही काही प्रोमो आणि ‘टायटल मोन्टाज’ हे त्या मालिकांची ओळख बनून राहतात, त्यामुळे लाखो रुपये खर्च करण्याची वाहिन्यांची तयारी असते. ‘झी मराठी’च्या ‘सारेगमप’च्या नव्या पर्वासाठी असेच वेगळे प्रोमो तयार केले गेले आहेत. नव्या सुरांमध्ये गिटारवर ‘ज्ञानेश्वर माऊली’चा ठेका धरणारा तरुण लोकांमध्ये इतका लोकप्रिय झाला आहे, की त्याने घातलेला कुर्ता कुठे मिळेल, याचीही विचारणा होतेय, असे या शोच्या सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा