हिंदू देव-देवतांची खिल्ली उडविणारी दृश्ये असलेल्या ‘पीके’ या चित्रपटाविरुद्ध बंजरंग दल, विहिंपच्या कार्यकर्त्यांचा रोष अधिकाधिक उफाळून आला असून, त्याची परिणती सोमवारी या चित्रपटाचे प्रदर्शन करणाऱ्या चित्रपटगृहांवरील हल्ल्यांत झाली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हातात लोखंडी सळ्या, लाठय़ा-काठय़ा घेऊन अहमदाबाद, भोपाळ आणि काश्मीरमधील चित्रपटगृहांवर जोरदार हल्ला चढवून मोडतोड केल्याचे वृत्त आहे.
अभिनेता आमिर खान याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पीके’ या चित्रपटामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर अहमदाबाद शहरातील ज्या दोन चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन सुरू आहे त्या चित्रपटगृहांवरही कार्यकर्त्यांनी सोमवारी हल्ला चढविला.
बजरंग दल संघटनेचे शहरप्रमुख ज्वलित मेहता यांच्या नेतृत्वाखालील २० कार्यकर्त्यांनी शहरातील गोल्ड आणि शिव या चित्रपटगृहांवर हल्ला चढविला आणि तिकीट खिडक्यांची मोडतोड करून चित्रपटाची पोस्टर्सही टरकावली. या घटनेची खबर मिळताच नवरंगपुरा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. मात्र पोलीस येण्यापूर्वीच कार्यकर्ते पसार झाले.
या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे त्याचा सुगावा अद्याप लागलेला नाही. हल्लेखोरांनी चित्रपटगृहाच्या तिकिटांच्या खिडक्यांची मोडतोड केल्याचे आम्हाला कळले असून, आता सीसीटीव्ही फूटेज गोळा करून आम्ही हल्लेखोरांचा तपास करीत आहेत, असे पोलिसांनी सांगितले. तथापि, बजरंग दलाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून सदर चित्रपटाचे प्रदर्शन करणाऱ्या अन्य चित्रपटगृहांनाही इशारा दिला आहे.
चित्रपटगृहाच्या मालकांची बैठक बोलावून त्यांना या चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी आमच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्ही काय करू शकतो हे दाखविण्यासाठी आम्ही चित्रपटगृहांवर हल्ला चढविला. चित्रपटाचे प्रदर्शन त्वरित थांबविण्यात आले नाही, तर काही दिवसांत अधिक हल्ला करण्यास आम्ही कचरणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा