बॉलिवूडकर कशात काय शोधतील, याचा अंदाज बांधणे कदाचित ब्रह्मदेवालाही अशक्य आहे. याच लोकांनी इम्रान खानमध्ये आमीर आणि शाहरूख खानमध्ये अमिताभ बच्चन शोधायचा प्रयत्न केला होता. आता असाच प्रयत्न दिग्दर्शक रोहन सिप्पी याने आपल्या ‘नौटंकी साला’ या नव्या चित्रपटात केला आहे. या वेळी रोहनने पुजा साळवी या नव्या अभिनेत्रीमध्ये चक्क माधुरी दीक्षितला शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी रोहनने या चित्रपटात चक्क ‘बेटा’ चित्रपटातील ‘धक धक करने लगा..’ हे प्रसिद्ध गाणे वापरले आहे. विशेष म्हणजे एकेकाळी लोकांनी माधुरीमध्येही ‘मधुबाला’ शोधण्याचा प्रयत्न केला होता.
उत्तम अभिनय आणि लयबद्ध नृत्ये यांचा अविट संगम म्हणजे माधुरी दीक्षित! तिने एकेकाळी भल्याभल्यांना मोहिनी घातली होती. त्यात रोहन सिप्पी, पुजा साळवी यांच्यासारखे त्या वेळी कोणीच नसलेलेही अनेक होते. ‘धक धक करने लगा..’ या गाण्यावर आपलीही पावले थिरकली होती. या गाण्यात माधुरी दीक्षित काही वेगळीच दिसली आहे. हे गाणे आपल्या एका चित्रपटात वापरण्याचे स्वप्न लहानपणी बघितले होते. ‘नौटंकी साला’ या चित्रपटाद्वारे लहानपणी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता होत असल्याचे रोहनने सांगितले.
माधुरीला पडद्यावर पाहत मोठय़ा झालेल्या इतर मुलींप्रमाणे पुजाचा आदर्शही माधुरीच आहे. ‘तेजाब’मधल्या ‘एक दो तीन.’ या गाण्यावरचे नृत्य असो की, ‘पुकार’मधल्या ‘के सरा सरा’ या गाण्यावर तिने प्रभुदेवाला दिलेली टक्कर असो, पुजाला माधुरीचे प्रत्येक नृत्य आवडते. पण त्यातही ‘धक धक करने लगा’ या गाण्यातील माधुरीच्या नृत्यावर पुजा विशेष फिदा आहे. आता याच गाण्याच्या रिमिक्सवर आपल्याला थिरकायला मिळणार, याचा तिला खूप आनंद आहे.