चित्रपटाचा विषय, त्याची पटकथा आणि त्याची हाताळणी या सर्वच बाबींवर हा चित्रपट वेगळा ठरतो. भारतीय प्रेक्षकांना प्रचलित असलेल्या चित्रपटांच्या धाटणीचा हा चित्रपट नाही. त्यामुळे हा चित्रपट एका ठरावीक ‘क्लास’ला आवडला, तरी ‘मास’ कितपत चांगला प्रतिसाद देईल, याबाबत शंका आहे..
स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासाकडे नजर टाकली, तर काही महत्त्वाचे टप्पे नजरेआड करून चालणार नाहीत. १९९१-९२च्या सुमारास पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळातील तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची कवाडं खुली केली. आणि भारताच्या इतिहासात ‘एल.पी.जी.’चं नवीन पर्व सुरू झालं. ‘जागतिकीकरण-खासगीकरण-उदारीकरण’ या नवीन त्रिसूत्रीचा परिणाम थेट सामान्य जनतेवर दिसायला लागला आणि वातावरण दिवसेंदिवस झपाटय़ाने बदललं.
याच काळातलं पुणं तसं सनातनीच होतं. पेठांमध्ये अडकलेलं पेन्शनरांचं पुणं. पण त्या सनातनी विचारांच्या पुण्यातही बदल होत होतेच. नेमका हाच बदलाचा कॅनव्हास मागे ठेवून निखिल महाजन या दिग्दर्शकानं ‘पुणे ५२’ नावाचं ‘अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग’ चितारलं आहे. या चित्रपटाचा विषय काय, याला नेमकं असं उत्तर देता येणं कठीण आहे. तो कसा आहे, असं विचारलं, तर ‘वेगळा’ एवढंच उत्तर देता येऊ शकतं. अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग कसं, एखाद्याला आवडतं, तर एखाद्याच्या डोक्यात काहीच प्रकाश पडत नाही!
‘पुणे ५२’ या चित्रपटाची नेमकी कथा सांगण्यात काहीच मजा नाही. ही गोष्ट अमर आपटे (गिरीश कुलकर्णी) या खासगी गुप्तहेराची आहे, असं म्हटलं तर निखिल महाजनने चितारलेल्या भव्य कॅनव्हासचा अपमान होतो. पण तरीही ही गोष्ट आहे अमर आपटेची! हेरगिरी करताना त्याला फारसं उत्पन्न मिळत नसल्याने त्याची पत्नी प्राची (सोनाली कुलकर्णी) त्याच्यावर कावली आहे. यात अमरकडे नेहा साठे (सई ताम्हणकर) एक केस घेऊन येते. तिला तिचा नवरा, बिल्डर प्रसाद साठे (किरण करमरकर), याच्यापासून सुटका हवी आहे आणि त्यासाठी अमरने तिला मदत करावी, अशी तिची इच्छा आहे. याच बिल्डरशी निगडित अशाच एका केसमध्ये हात पोळलेले असूनही केवळ जुना हिशोब चुकता करायला अमर ही केस स्वीकारतो आणि सुरू होतो बदलांचा झंझावात! हे बदल अमरच्या व्यावसायिक आयुष्यात तर होतातच, पण ते त्याच्या खासगी आयुष्यातही होतात.खरं तर चित्रपटाची कथा सांगता येणारच नाही. पटकथा लिहिताना निखिल महाजन याच्यातला दिग्दर्शक नक्कीच त्याच्यातल्या पटकथाकारावर भारी झाल्याचं जाणवतं. चित्रपटाच्या प्रसिद्धीपासूनच, हा एक वेगळाच चित्रपट आहे, या निखिलने केलेल्या जाहीर विधानाची खात्री चित्रपट बघताना वारंवार पटते. चित्रपटाची हाताळणी करताना निखिलने त्याच्यातल्या कल्पक दिग्दर्शकाचा पुरेपूर वापर केला आहे. जग बदलतंय, हे वाक्य अमरच्या परिचयातले दळवीकाका त्याला ऐकवतात. मात्र खुद्द अमरच्या खासगी आयुष्यात एक मोठा बदल होत असतानाच दळवीकाकांचं निधन होतं. कदाचित ‘जुनें जाऊ द्या मरणालागुनी’ असा विचार यात असावा. अमर आणि प्राचीमध्ये कडाक्याचं भांडण झाल्यावर अमरने खिडकीच्या काचेवर जोरदार ठोसा मारणं आणि खिडकीच्या बाहेरच्या बाजूला असलेलं चिमणीचं घरटं खाली पडणं व त्याच रात्री अमरने नेहाकडे जाणं, यातही दिग्दर्शक दिसतो. त्याचप्रमाणे अमरच्या मनात टेलिफोन रिंगची भीती बसणं, ती रिंग त्याला सतत ऐकू येत राहणं, नेहा आणि अमरमध्ये एक ‘अंडरकरंट’ वाहत असणं, प्राची आणि अमरच्या आयुष्यातील ताणतणाव आणि अचानक त्यात झालेला बदल या सगळ्याच गोष्टी दिग्दर्शकाने नेमक्या चितारल्या आहेत.
या चित्रपटाचं छायांकन जेरेमी रिगन या न्यूझीलंडमधील छायाचित्रणकारानं केलं आहे. जागतिक चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकाला जेरेमीनं केलेल्या छायांकनाचं अप्रूप वाटणार नाही. पण भारतीय चित्रपट पाहण्याची सवय असलेल्या प्रेक्षकांना ही गोष्ट नक्कीच नवीन आहे. या चित्रपटात कॅमेरा एका पात्राचं काम करतो. संपूर्ण चित्रपटभर प्रेक्षक स्वत: फ्रेममध्ये असल्यासारखा वावरतो, ही त्या कॅमेराची कमाल आहे. इतर जागतिक चित्रपटांसारखाच चित्रपटाचा वेग धीमा आहे. चित्रपटाच्या सुरुवातीच्या प्रसंगातील कॅमेराची हाताळणी ‘शिंडलर्स लिस्ट’मधल्या सुरुवातीच्या प्रसंगातील कॅमेराच्या हाताळणीची आठवण करून देणारी आहे. कॅमेरा खूप चांगल्या पद्धतीने अमर आपटेचं कॅरेक्टर उभं करतो. तिथे कोणत्याही संवादाची गरज पडत नाही. हा कॅमेरा जवळपास प्रत्येक प्रसंगात तेवढय़ाच ताकदीचं काम करतो. अपवाद फक्त अमर नेहाच्या घरी शेवटचा जातो, त्या प्रसंगातला. त्या प्रसंगात अमर नेहाला ढकलून देतो आणि बराच काळ एक संवाद बोलतो. त्या वेळी कॅमेरा गिरीशच्या डोळ्यातले भाव टिपण्यास कमी पडला आहे. चित्रपटाची दुसरी बाजू म्हणजे पाश्र्वसंगीत आणि संगीत. ह्य़ुन जंग शिम या कोरियन संगीतकाराने पाश्र्वसंगीतात खूप ‘रॉ’ आवाज टिपले आहेत. पंख्याची घरघर, टेलिफोनची बेल, स्कूटरचा आवाज, पाखरांचा चिवचिवाट अशा अनेक आवाजांनी या ‘अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग’मध्ये रंग भरले आहेत. त्याचप्रमाणे पिआनो, गिटार वगैरे वाद्यांचा वापर करून काही जागा अप्रतिम भरल्या आहेत. हे तुकडेही थेट मोझार्ट किंवा बिथोवनच्या सिंफनीची आठवण करून देतात.
या चित्रपटातील बोल्ड सीन्स तर कमालच आहेत. काही ‘इंटिमेट’ चुंबनदृश्ये व बेडसीन्स गिरीश आणि सई या दोघांनी कमालीच्या सहजतेने दिली आहेत. मुख्य म्हणजे चित्रपटाच्या कथेत ही दृश्ये सहज येतात. त्यात कुठेही ओढूनताणून मसाला आणण्याचा प्रयत्न केलेला नाही.
अभिनय ही आणखी एक चांगली बाजू आहे. गिरीश कुलकर्णीने आतापर्यंत खेडवळ भूमिकांमध्ये आपली छाप सोडली आहे. पण या चित्रपटात तो संपूर्ण शहरी भूमिकेत आहे. प्रेक्षकांना कदाचित हा बदल स्वीकारणं कठीण जाईल. पण त्याने ही भूमिका, त्या पात्राच्या आयुष्यातील ताणतणाव, त्याच्यातली ‘ग्रे शेड’ उत्तम उभी केली आहे. एका पॉइंटला तो ‘स्क्रिझोफेनिक’ झाल्याची शंका येते. किंबहुना दिग्दर्शकाला तेच अपेक्षित असावं. पण तेदेखील गिरीशने आपल्या हावभावातून नेमकं दाखवलं आहे. सोनाली कुलकर्णी तर नेहमीच चांगलं काम करते. पण या चित्रपटातील प्राचीचं पात्र काहीसं अवघड होतं. पैशांच्या चणचणीमुळे कावलेली, मूल होत नसल्याने आणि आईकडून (भारती आचरेकर) टोमणे ऐकावे लागत असल्याने त्रासलेली आणि नवऱ्याच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल पूर्णपणे अंधारात असलेली प्राची सोनाली कुलकर्णीने खूप चांगल्या प्रकारे रेखाटली आहे. त्या पात्रातला एक निरागसपणाही ती नेमका मांडते. सई ताम्हणकरच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात प्रभावी भूमिका तिला या चित्रपटात साकारण्याची संधी मिळाली. तिची संवादफेक एकाच छापाची आणि एकसुरी असली, तरी तिने नेहा खूप मस्त टेचात उभी केली आहे. त्याशिवाय भारती आचरेकर, गो. पु. देशपांडे, किरण करमरकर, स्वानंद किरकिरे यांनीही छोटय़ा छोटय़ा भूमिकांमध्ये आपलं योगदान दिलं आहे.
चित्रपटाची लंगडी बाजू म्हणजे धीमी लय. प्रेक्षकाला या चित्रपटाची लय खूपच कंटाळवाणी वाटू शकते. चटपटीत, चुरचुरीत संवाद, दे मार हाणामारी किंवा विनोदाची पखरण अशा पठडीतल्या चित्रपटांपेक्षा हा चित्रपट नक्कीच वेगळा असल्याने त्यात प्रेक्षकांना ‘कनेक्ट’ मिळण्याची शक्यताही खूप कमी आहे. त्याचप्रमाणे पटकथाकाराने पटकथेला नेमकं टोक दिलं नसल्यानं चित्रपट अर्धवट संपल्यासारखा वाटतो. स्वत: गुप्तहेर असलेल्या अमरवर नेमकं कोण पाळत ठेवत असतं आणि कशासाठी, हेदेखील शेवटपर्यंत कळलेलं नाही. थोडक्यात एखादं अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग पाहून जेवढे प्रश्न पडू शकतील तेवढे प्रश्न ‘पुणे ५२’ बघितल्यानंतर पडू शकतात. पण त्या पेंटिंगमधलं जे आवडेल, ते प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर पडल्यानंतरही त्याला चिकटून राहील आणि अस्वस्थ करेल. विलंबित लयीतला ख्याल ऐकण्याची मजा ज्यांना घेता येते, त्यांना या चित्रपटाचा धीमा वेग नक्कीच कळेल. लिओनार्दो दा व्हिन्सी या प्रसिद्ध कलाकाराचं तेवढंच प्रसिद्ध चित्र आहे ‘मोनालिसा’! या चित्रात मोनालिसाच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य आहे. त्या हास्यामागचं गूढ ज्यांना समजलं असेल, त्यांना हा चित्रपट नक्कीच भुरळ पाडेल.
‘अरभाट’ निर्मित आणि आयएमई मोशन पिक्चर्स प्रस्तुत
‘पुणे ५२’
मूळ कथा व पटकथा – निखिल महाजन, संवाद – गिरीश कुलकर्णी, दिग्दर्शन – निखिल महाजन, छाया – जेरेमी रेगेन, संकलन – अभिजित देशपांडे, ध्वनी – बेलॉन फॉन्सेका, पाश्र्वसंगीत – ह्य़ुन जंग शिम, संगीत – आतीफ अफझल, कलाकार – गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, भारती आचरेकर, किरण करमरकर, गो. पु. देशपांडे, स्वानंद किरकिरे आणि श्रीकांत यादव.

Story img Loader