कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे शुक्रवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ४६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेकांना धक्का बसला. कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, पुनीत यांच्या निधनाची बातमी ऐकून एका चाहत्याला धक्का बसला आणि त्याचे निधन झाले.

कर्नाटकमधील हनूर तालुक्यातील मारो गावात राहणाऱ्या पुनीत यांच्या एका चाहत्याचे निधन झाले आहे. पुनीत यांच्या निधनाची बातमी ऐकून ३० वर्षांच्या या चाहत्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या चाहत्याचे नाव मुनियप्पा असे होते. मुनियप्पा पुनीत यांच्या निधनाचे वृत्त ऐकून रडू लागला. दरम्यान, तो अचानक जमिनीवर कोसळला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयाच दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याचे निधन झाल्याचे सांगितले.
आणखी वाचा : अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या निधनाची बातमी देताना वृत्तनिवेदिकेला कोसळले रडू

दुसरीकडे पुनीतच्या निधनाची बातमी ऐकून एका चाहत्याने आत्महत्या केली आहे. ही घटना कर्नाटकमधील अथानी गावात घडली आहे. या चाहत्याचे नाव राहुल गादिवादारा असे आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राहुलने पुनीतचा फोटो फुलांनी सजवला होता आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.

पुनीत राजकुमार हे कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा सर्वात लहान मुलगा आणि प्रख्यात स्टार KFI शिवराज कुमार यांचा धाकटा भाऊ आहे. त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेट्टाडा हूवू’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. तसेच ‘चालिसुवा मोडागलू’ आणि ‘येराडू नक्षत्रगलू’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे.

पुनीत २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अप्पू या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आले होते. त्यांनी आतापर्यंत कन्नडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभि, वीरा कन्नडिगा, अजय, अरासू, राम, हुदुगारू आणि अंजनी पुत्र या चित्रपटात काम केले आहे.

Story img Loader