चिन्मय पाटणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रशिक्षण देऊन देशासाठी सक्षम लष्करी अधिकारी घडवणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) ही संस्था देशाचा मानबिंदू आहे. पुण्याजवळील खडकवासला येथे असलेल्या एनडीएची गेल्या ७५ वर्षांची वाटचाल एका माहितीपटातून उलगडण्यात आली आहे. उद्योजक, चित्रपट निर्माता, सामाजिक कार्यकर्ते पुनीत बालन यांनी त्यांच्या ‘पुनीत बालन स्टुडिओज’ या निर्मिती संस्थेद्वारे एनडीएच्या वाटचालीचा वेध घेणारा खास माहितीपट साकारला आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या माहितीपटासाठी आवाज दिला आहे. 

एनडीएचा अमृत महोत्सवी वर्षांचा कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमात ‘७५ इयर्स ऑफ एनडीए’ या माहितीपटाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘पुनीत बालन स्टुडिओज’ या यूटय़ूब वाहिनीवरही हा माहितीपट पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. एनडीएवरील या माहितीपटाच्या निर्मितीविषयी निर्माता पुनीत बालन यांनी माहिती दिली. ‘एनडीए ही देशासाठी महत्त्वाची संस्था आहे. सर्वसामान्य नागरिकांना या संस्थेबाबत कुतूहल असते. ३५ वर्षांपूर्वी एनडीएचा माहितीपट केलेला होता. त्यानंतरच्या काळात एनडीएमध्ये खूप बदल झाले, त्यामुळे संस्थेच्या ७५व्या वर्षांच्या निमित्ताने संस्था प्रमुखांनी माहितीपट करण्याबाबत विचारणा केली. आम्ही चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात काम करत असल्याने आम्ही त्यासाठी होकार दिला. आम्हाला ही संधी मिळाली याचा आनंद आहे’, असे बालन यांनी सांगितले.

हेही वाचा >>> Ram Mandir : काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत; कारण सांगत म्हणाले…

एनडीएवरील माहितीपट करणे आव्हानात्मक होते. संस्थेत असलेला सुदान ब्लॉक काय आहे? त्यामागची पार्श्वभूमी काय? यासह एनडीएचा समग्र इतिहास संकलित करावा लागला. एनडीएमधील छात्रांचे जीवन कसे असते, त्यांचे कठोर प्रशिक्षण याबाबतचे तपशील घेण्यात आले. माहितीपटाची संहिता आम्हाला अनेकदा बदलावी लागली. या सर्व प्रक्रियेमध्ये एनडीए प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य करण्यात आले. तनुज भाटिया, तनुका लघाटे यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे, अशी माहितीही बालन यांनी दिली. 

अमिताभ बच्चन यांनी त्यांचा भारदस्त आवाज या माहितीपटाला दिला आहे. अमिताभ बच्चन यांचा आवाज देण्याची कल्पना कशी सुचली याविषयीही पुनीत बालन यांनी सांगितले. ‘या माहितीपटाला अमिताभ बच्चन यांचा आवाज असावा अशी कल्पना पुढे आली. बच्चन यांच्याशी चांगले संबंध असल्याने आम्ही त्यांना त्यासाठी विचारणा केली. तसेच एनडीएकडूनही त्यांना संपर्क साधण्यात आला, त्यामुळे त्यांनीही लगेच होकार दिला. महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी या माहितीपटाला आवाज देण्यासाठी मानधनही घेतलेले नाही. त्यांनी अतिशय शांतपणे काम केले. ‘तुम्हाला योग्य वाटते आहे का पहा, हवे असल्यास रिटेक घ्या’ असे ते आवर्जून सांगत होते. स्वत:चे शंभर टक्के देऊन त्यांनी या माहितीपटासाठी योगदान दिले, त्यामुळे हा माहितीपट वेगळया उंचीवर गेला आहे’ असे बालन यांनी सांगितले.  पुनीत बालन गेली काही वर्ष वेगवेगळया माध्यमातून लष्कराशी जोडले गेले आहेत. लष्करासोबत सुरू असलेल्या कामांबाबत पुनीत बालन यांनी सांगितले की, माझे आजोबा लष्कराच्या मद्रास रेजिमेंटमध्ये होते. ते कर्नल पदावरून निवृत्त झाले. ते माझे आदर्श होते. मलाही लष्करात जाण्याची इच्छा होती, पण मला जमले नाही. त्यामुळे आता माझ्या परीने लष्कराला मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे. लष्कराच्या नॉर्दर्न कमांड, सदर्न कमांड आणि सेंट्रल कमांडसाठी काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘काश्मीरमध्ये लष्कराच्या साहाय्याने शाळाही चालवण्यात येते आहे’ असे सांगतानाच एनडीएप्रमाणेच लष्कराची ‘११ गुरखा रेजिमेंट’ही अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करते आहे, त्यामुळे या रेजिमेंटवरही माहितीपट तयार करण्यात आला आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांच्या हस्ते या माहितीपटाचे प्रकाशन करण्यात येणार आहे, अशी माहिती बालन यांनी दिली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punit balan group releases documentary marking 75 years of nda zws
Show comments