प्रसिद्ध पंजाबी अभिनेता व गायक सिप्पी गिलच्या गाडीचा अपघात झाला आहे. हा अपघात कॅनडामध्ये झाला आहे. ब्रिटिश कोलंबिया भागात सिप्पीची गाडी उलटली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर स्वतः सिप्पीने शेअर केला आहे. त्याने या अपघाताबद्दलही माहिती दिली आहे.
सिप्पी म्हणाला, “आम्ही सर्व मित्र कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया इथं निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी गेलो होतो. दरम्यान, माझ्या मित्रांनी माझ्यासोबत रूमवर थांबण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान मी एकटाच ऑफ-रोडिंगसाठी निघालो. रुबिकॉन कारने जात असताना कार उलटली. मला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र कारचं मोठं नुकसान झालं आहे. तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने मला मदत केली. या अपघाताबाबत मदत करणारा म्हणाला की, या रस्त्यावर अशा घटना सतत घडत असतात.”
व्हिडीओमध्ये दिसत आहे की सिप्पीची कार उलटली असून तिचं मोठं नुकसान झालंय. त्याला या गाडीतून बाहेर पडण्यास एका व्यक्तीने मदत केली, त्याचेही तो आभार मानताना दिसतो. वेळीच मदत मिळाल्याने त्याला गाडी तिथून नेता आली. सिप्पीला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातात इतर कोणालाही दुखापत झाली नसल्याचा आनंद आहे, असं सिप्पी म्हणाला.
दरम्यान, सिप्पी गिल हा पंजाबी गाण्यांसाठी ओळखला जातो, त्याची गाणी खूप लोकप्रिय आहेत. त्याचं ‘सोलमेट’ हे गाणं खूप गाजलं होतं. याशिवाय ‘बेकदरा’ हे गाणंही खूपच हिट झालं होतं, या गाण्याला आतापर्यंत १८० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.