सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरण चांगलंच गाजलं. त्याच्या हत्येमुळे मनोरंजनविश्व आणि राजकीय विश्वात बरीच खळबळ उडाली. त्याला मारणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई आणि त्याच्या गँगला पकडण्यात यश मिळालं असलं तरी या गँगनेसुद्धा पोलिसांच्या कामात बराच अडथळा आणला होता. लॉरेन्स बिष्णोईची तबब्ल ७०० सदस्यांची बिष्णोई गँग असल्याचं सांगितलं जातं. दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थान अशा पाच राज्यांमध्ये झालेल्या अनेक हत्या ाणि खंडणीच्या प्रकरणांमध्ये या बिष्णोई गँगचं नाव गुंतलं आहे.
सिद्धूच्या हत्येनंतर पंजाब आणि इतर मनोरंजनसृष्टीतील लोकांनीही यावर प्रतिक्रिया दिली. नुकतंच पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याने या प्रकरणावर भाष्य करत याचा संपूर्ण दोष पंजाब सरकारला दिला आहे. एकूणच पंजाबमधील कलाकारांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल आणि मुसेवाला प्रकरणामध्ये दिलजीतने याचं खापर पंजाब सरकारच्या माथी फोडलं आहे.
‘फिल्म कम्पॅनियन’शी संवाद साधताना दिलजीत म्हणाला, “एक कलाकार कुणाचंच काही वाईट करू इच्छित नसतो. हे मी स्वानुभवावरून सांगतो. कुणी एखाद्या कलाकाराला का मारेल? याविषयी बोलणंसुद्धा माझ्यासाठी खूप कठीण आहे. ज्या आई वडिलांनी त्यांचा एकुलता एक मुलगा गमावला आहे त्यांचं दुःख काय आहे याची कल्पना करून बघा. १००% हा सरकारचा नालायकपणा आहे. हे राजकारण आहे आणि हे असं राजकारण घाणेरडं आहे. पीडित लोकांना न्याय मिळो यासाठी आपण प्रार्थना करू शकतो.
पंजाबमधील त्या काळात ज्या ४२४ लोकांना दिलेली सुरक्षा काढून घेण्यात आली त्यामध्ये मुसेवालाचं नाव होतं हेदेखील दिलजीतने स्पष्ट केलं. दिलजीत नुकताच ‘जोगी’ या चित्रपटात झळकला होता. हा चित्रपट १९८४ साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या शिखांच्या नरसंहारावर भाष्य करणारा होता.