झगमगत्या विश्वातील ग्लॅमरमागे सेलिब्रिटींना अनेक वाईट प्रसंगांचा सामना करावा लागतो. सिनेविश्वात स्वतःची ओळख निर्माण करत अनेक स्त्रियांना अडचणींतून जावं लागतं. याबद्दल आधी अनेक स्त्रिया शांत बसत असत. मात्र आता याबद्दल त्या आवाज उठवताना दिसतात. अशातच प्रसिद्ध पंजाबी गायिका सुनंदा शर्माने (Punjabi Singer Sunanda Sharma) एका संगीत कंपनीच्या मालकाच्या निर्मात्यावर फसवणूक आणि शोषण केल्याचा आरोप केला आहे. हा संगीत निर्माता म्हणजे पुष्पेंद्र (पिंकी) धालीवाल (Pinki Dhaliwal). गायिकेने त्याच्यावर आर्थिक शोषण, फसवणूक, कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करण्याची सक्ती, बदनामीची धमकी आणि वैयक्तिक मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा केल्याचे आरोप केले आहेत. या आरोपांनंतर, निर्मात्याविरुद्ध मटौर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली.

सुनंदा शर्माचे निर्मात्यावर आरोप

पिंकीच्या अटकेनंतर पंजाबी गायिका सुनंदा शर्माने (Punjabi Singer Sunanda Sharma) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिनं लिहिलं आहे की, “हा मुद्दा फक्त कोणत्याही कराराचा किंवा पैशाचा नाही. ही समस्या मला खूप दिवसांपासून अस्वस्थ करत आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या आणि मगरीच्या जाळ्यात अडकणाऱ्या प्रत्येक कलाकाराची ही समस्या असते. ते आम्हाला कठोर परिश्रम करायला लावतात आणि आमच्या कमाईने त्यांचे घर भरतात. ते आम्हाला भिकाऱ्यांसारखे वागवतात. जर तुम्ही त्यांना काहीही विचारलं तर ते म्हणतात, ‘मी तुला उदरनिर्वाहाचे साधन दिलं आहे.”

“मानसिक त्रासामुळे आत्महत्या करण्याचा विचार”

यापुढे तिने म्हटलं की, “यामुळे मला इतका मानसिक त्रास झाला की, मी माझ्या खोलीत जाऊन रडायचे आणि बऱ्याचदा मी आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. तरीही मी हसत सर्वांसमोर येत राहिली. मी हुशार होते आणि मला माहित होते की, जर मी लोकांसमोर रडत राहिले तर, एका मगरीच्या जाळ्यातून सुटेन आणि दुसऱ्या मगरीच्या जाळ्यात अडकेन. मला माहित नाही की माझ्यासारखे आणखी किती गरीब लोक अशा लोकांच्या जाळ्यात अडकले आहेत. पण आता सगळ्यांनी एकत्र या. ही वेळ एकत्र येण्याची आहे. सरकार नेहमीच महिलांबरोबर आहे.”

सुनंदा शर्माने मानले सरकारचे आभार

यापुढे सुनंदाने (Sunanda Sharma) सरकारचे आभारही मानले आहेत. “गेल्या दोन वर्षांपासून माझे हक्क मिळवण्यासाठी मी सरकारला मदत करण्याचे आवाहन करत होते आणि मुख्यमंत्र्यांनी माझी समस्या ऐकली याबद्दल मी त्यांचे आभार. तुम्ही फक्त माझी समस्या ऐकली नाही, तर त्या सर्व महिलांचा आवाजही ऐकला ज्या कधीही त्यांच्या हक्कांसाठी लढू शकल्या नाहीत. तसंच पंजाबमधील माध्यमांचेदेखील पाठिंब्याबद्दल आभार.”

Story img Loader