सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेला अनेक कारणांमुळे प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे. या मालिकेत राणी अहिल्याबाई होळकर या भारतीय इतिहासातील एका अत्यंत कुशल महिला शासकाच्या प्रेरणादायक जीवनचरित्राचे चित्रण आहे, ज्यांनी आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या मदतीने समजातील परंपरा आणि रूढींना आव्हान देऊन इतिहासाला एक वेगळी दिशा दिली.
मालिकेतील सध्याच्या कथानकात अहिल्या आणि रेणू यांच्यातल्या गाढ मैत्रीचे चित्रण केलेले आहे. रेणू एक विधवा आहे व त्यामुळे समाज तिच्याकडे तिरस्काराच्या नजरेने पाहतो. परंतु अहिल्या मात्र रेणूकडे अशा दृष्टीने पाहात नाही. ती नेहमी रेणूची कड घेते, तिची काळजी घेते आणि तिच्यावर खूप प्रेम करते.
मालिकेत अहिल्येच्या सासूची म्हणजे गौतमाबाईंची भूमिका करणारी अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिला या गोष्टीचा आनंद वाटतो की, या मालिकेत प्रेक्षकांना अनेक मौलिक संदेश दिले जातात आणि विविध सामाजिक समस्यांचा विचार त्यात केला जात आहे.
View this post on Instagram
आपले विचार मांडताना स्नेहलता वसईकर म्हणते, “मैत्रीमध्ये समतोल असायला हवा आणि त्यात दोघांना काही तरी शिकायला वाव असायला हवा. जो मित्र तुमचे योग्य नाही हे जाणून देखील तुमच्या हो ला हो करतो, तो खरा मित्रच नव्हे; जो मित्र तुमची क्षमता ओळखून तुम्हाला अधिक वरची पायरी गाठण्यासाठी प्रोत्साहित करतो, तो खरा मित्र. मित्राला त्याची क्षमता अधिक वाढवण्याची गरज आहे, हे सांगण्यासाठी धाडस लागते. मला आनंद वाटतो, की आमच्या या मालिकेतून लोकांना मैत्रीचे एक सुंदर नाते बघायला मिळते आहे.”
या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा आहिल्याबाई होळकरांचा प्रवास त्याचं कर्तृत्व लोकांपर्यंत पोहचत आहे.