नागराज मंजुळेचा ‘झुंड’ चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पहिल्यांदाच बिग बी अर्थात अमिताभ बच्चन नागराज सोबत काम करत होते. चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही मात्र समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले. अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात व्यस्त आहेत. त्यांनी नुकतेच आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
विकास बहल दिग्दर्शित ‘गुडबाय’ या चित्रपटात अमिताभ बच्चन दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात पुष्पा फेम अभिनेत्री रश्मीका मंदना देखील दिसणार आहे. तिचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असणार आहे. अमिताभ बच्चन तिच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत. याआधी निर्मात्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित केला होता, ज्यामध्ये ही जोडी दर्शविण्यात आली होती. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये त्यांचे कुटुंब आणि पाळीव प्राणी दिसत आहे. एका सुखी कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणारे हे कुटुंब वाटत आहे. नीना गुप्ता देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर त्यांच्या बरोबरीने पावेल गुलाटी, अभिषेक खान, साहिल मेहता आणि पायल थापा यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत.
झुंड’ आणि ‘रनवे ३४’ मध्ये शेवटचे दिसलेले बिग बी आता पुन्हा एकदा नव्या रूपात आपल्याला बघायला मिळणार आहेत. दुसरीकडे रश्मिकाला पुष्पा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर देखील प्रेम मिळत आहे. अभिनेत्री सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ मध्येही दिसणार आहे. अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या भूमिकांमधून दिसून येत असतात. दिग्दर्शक विकास बहल यांनी ‘सुपर ३०’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
‘गुडबाय’चा ट्रेलर उद्या चित्रपटाच्या कलाकार आणि क्रूद्वारे प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी एकता कपूर यांनी सांभाळली आहे. चित्रपट ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अमिताभ बच्चन यांचे चाहते देखील त्यांचा नवा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.