ओटीटी या माध्यमाने मनोरंजनाची व्याख्या पूर्णरूपी बदलली आहे. भारतात विविध निर्मितीगृहांनी व व्यावसायिकांनी ओटीटी क्षेत्रात झेप घेतली आहे. परंतु मराठी भाषेला जो दर्जा मिळायला हवा तो या ओटीटीवर मिळताना दिसत नाही. यासाठी निर्माते अक्षय बर्दापूरकर, अभिनेता पुष्कर श्रोत्री व संगीत संयोजक आदित्य ओक मिळून मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येत आहेत.
‘प्लॅनेट मराठी’ असं या ओटीटी प्लॅटफॉर्मचं नाव असून ‘म मनाचा, म मराठीचा’ अशी त्याची टॅगलाईन आहे. चित्रपट, नाटकं, सत्य घटनांवर आधारित व काल्पनिक कलाकृती, वेब सीरीज, माहितीपट हे सर्वकाही या मराठी ओटीटी उपलब्ध असणार आहे. मनोरंजनच नव्हे तर पाककला, व्यायाम, लहान मुलांचे माहितीपर कार्यक्रम हे सारेच या ओटीटीवर उपलब्ध असेल.
प्लॅनेट मराठी सेलर सर्व्हिसेस प्रा. लि. चे सीएमडी व मराठी चित्रपटसृष्टीतले नावाजलेले निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी प्लॅनेट मराठी ओटीटीविषयी सांगितलं, “मराठी चित्रपट वितरणाच्या बाबतीत काही प्रमाणात मागे पडत असल्यामुळे आपल्या चित्रपटांच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवरील गणितही मागे पडतात असं चित्र आहे. त्यामुळे वितरणाच्या वेळी खर्च होणारा पैसा हा चित्रपटासाठी वापरला जाऊ शकतो. ओटीटीच्या माध्यमातून हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचवला जाऊ शकतो. शिवाय, यातून रोजगाराच्या संधी आणि नव्या टॅलेंटलाही वाव मिळेल आणि मराठीपण जपत हे माध्यम कायम प्रेक्षकांसाठी आणि मराठी कलाकारांसाठी काम करत राहील”.
प्लॅनेट मराठीबद्दल पुष्कर श्रोत्री म्हणाला, “प्लॅनेट मराठी हे बदलत्या काळाबरोबर बदलत्या मराठी मनोरंजनाची नवी परिभाषा लिहीत आहे”. पुष्कर प्लॅनेट मराठी सर्व्हिसेस प्रा. लि. चा सीईओदेखील आहे.