Pushpa 2 Box Office Collection Day 9 : ‘पुष्पा 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. याचदरम्यान चित्रपटाचा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुनला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली होती. दिवसभर घडलेल्या बऱ्याच घडामोडींनंतर त्याला तेलंगणा हायकोर्टाने चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या दिवसभरात ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचे नवव्या दिवसाचे कलेक्शन किती झाले, ते जाणून घेऊयात.
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना व फहाद फासिल यांच्या मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पुष्पा 2: द रुल’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन नऊ दिवस झाले आहेत आणि आतापर्यंत या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. आता या चित्रपटाच्या नवव्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाने रिलीजनंतरच्या दुसऱ्या शुक्रवारी भारतात अंदाजे ३६.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे देशातील एकूण कलेक्शन ७६२.१ कोटी रुपये झाले आहे.
हेही वाचा – अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला तरी जीव गमवावा लागत असेल तर…”
‘पुष्पा 2’ ची एका आठवड्याची कमाई
चित्रपटाची पहिल्या आठवड्यातील कामगिरी दमदार राहिली. एका आठवड्यात या सिनेमाने ७२५.८ कोटी रुपये कमावले. यामध्ये प्रिमियरचे १०.६५ कोटी रुपये आणि पहिल्या दिवसाची कमाई तब्बल १६४.२५ कोटींचा समावेश आहे. पहिल्या शुक्रवारी या चित्रपटाने ९३.८ कोटी रुपये कमावले होते. तिसऱ्या दिवशी शनिवारी ‘पुष्पा 2’ ११९.२५ कोटी आणि रविवारी १४१.०५ कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने सोमवारी ६४.४५ कोटी, मंगळवारी ५१.५५ कोटी, बुधवारी ४३.३५ कोटी आणि गुरुवारी ३७.४५ कोटी रुपयांची कमाई केली. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कमाईत घट झाली असून या चित्रपटाने ३६.३५ कोटी कमावले.
हेही वाचा – Video: अल्लू अर्जुनची अटक प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया, हात जोडत म्हणाला…
‘पुष्पा 2’ हा जगभरात जलद १००० कोटी रुपयांची कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘पुष्पा 2’ आता २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. अल्लू अर्जुनचा चित्रपट आणि प्रभास आणि दीपिका पादुकोणचा ‘कल्की 2898 एडी’ हे यंदाचे दोनच चित्रपट आहेत ज्यांनी यावर्षी बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या वर्षी आणखी एक सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणजे राजकुमार राव व श्रद्धा कपूर स्टारर चित्रपट ‘स्त्री 2’ होय. या चित्रपटाने ८७४.५८ कोटी रुपयांची कमाई केली.