‘पुष्पा २’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक नवे विक्रम केले आहेत. एकीकडे चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरु असताना दुसरीकडे याच सिनेमाच्या प्रीमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात एका महिलेच्या झालेल्या मृत्यूमुळे अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ होत आहे. सुरुवातीला त्याला या प्रकरणात अटक होऊन जामीन मिळाला त्यानंतर त्याच्या घरावर हल्ला झाला आणि त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. याच सिनेमाचे दिग्दर्शक सुकुमार यांना सुद्धा या प्रकरणामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
‘पुष्पा २’ च्या प्रीमियर दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणामुळे या चित्रपटाच्या टीमसह दिग्दर्शक सुकुमार यांच्यावरही टीका होत आहे. सुकुमार नुकतेच हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांच्याबरोबर अभिनेता रामचरणसुद्धा होता. याच कार्यक्रमात त्यांनी दिलेल्या एका उत्तराने सर्व जणांना धक्का बसला.
सुकुमार यांना हैदराबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांना विचारले गेले की, “एखादी अशी गोष्ट की जी तुम्हाला सोडायची आहे?” यावर सुकुमार यांनी विनोदाने उत्तर दिले, ‘सिनेमा. सुकुमार यांच्या या विधानामुळे उपस्थित सर्वांनाच धक्का बसला. कार्यक्रमात सुकुमार यांच्या बाजूला बसलेल्या अभिनेता रामचरणने दिग्दर्शकाने चित्रपट बनवणे सोडू नये असे स्पष्ट केले आणि लगेचच त्यांच्या हातातून माइक घेतला.
SHOCKING: Sukumar wants to LEAVE Cinema? pic.twitter.com/ZtbqV5I3JA
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 24, 2024
दरम्यान, ‘पुष्पा २’च्या प्रीमियर दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर तिच्या मुलाला गंभीर दुखापत झाली होती. अल्लू अर्जुन प्रीमियरसाठी चाहत्यांना भेटण्यासाठी गाडीतून उतरल्यावर प्रेक्षकांचा गर्दी वाढली आणि ही दुर्घटना घडली.
१३ डिसेंबर २०२४ रोजी अल्लू अर्जुनला या प्रकरणात अटक करण्यात आली. त्याला राहत्या घरातून ताब्यात घेऊन १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. त्यानंतर, त्याला ४ आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, कागदपत्रांच्या विलंबामुळे त्याला एक रात्र तुरुंगात काढावी लागली.
पोलीस अधिकाऱ्यांनी आता अल्लू अर्जुनच्या अंतरिम जामिनाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी असा आरोप केला आहे की, ४ डिसेंबर २०२४ रोजी थिएटर रिकामे करण्यास सांगूनही अल्लू अर्जुनने थिएटर सोडण्यास नकार दिला, ज्यामुळे पुढे चेंगराचेंगरी झाली.