अल्लू अर्जुनची मुख्य भुमिका असलेल्या ‘पुष्पा: द रुल’ने बॉक्स ऑफिस गाजवलं. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात तुफान कमाई केली. जवळपास दोन महिने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या या चित्रपटातील एका अभिनेत्याने आनंदाची बातमी दिली आहे. या चित्रपटात ‘जाली रेड्डी’ची भूमिका साकारणारा अभिनेता डाली धनंजयने लग्न केलं आहे.
‘जाली रेड्डी’ अर्थात डाली धनंजय विवाह बंधनात अडकला आहे. त्याने म्हैसूर येथील एक्झिबिसन ग्राउंडमध्ये एका खासगी सोहळ्यात लग्न केलं. त्याच्या पत्नीचे नाव धन्यता गौरकलर असून ती डॉक्टर आहे. डाली धनंजय व डॉ. धन्यता गौरकलर यांच्या लग्नातील काही फोटो समोर आले आहेत. त्यात त्यांच्या पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या लग्नाची झलक पाहायला मिळत आहे.
३८ वर्षांच्या धनंजयने लग्नात पारंपारिक सोनेरी काठ असलेली ऑफ-व्हाइट वेष्टी आणि कुर्ता परिधान केला होता. तर त्याची पत्नी डॉ. धन्यता गौरकलरने लाल काठांची गोल्डन साडी या खास दिवसासाठी निवडली होती.
पाहा फोटो –
धनंजयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो अखेरचा २०२४ चा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा: द रुल’मध्ये झळकला होता. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले होते. बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या ‘पुष्प: द रुल’ने जगभरात कमाईचे अनेक विक्रम मोडले. या चित्रपटाने जगभरात १७४०.९५ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट जवळपास दोन महिने थिएटरमध्ये दाखवण्यात आला. त्यानंतर ३० जानेवारीला हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम व कन्नड भाषेत रिलीज करण्यात आला. ‘पुष्पा: द रुल’ हा ‘पुष्पा: द राईज’चा सिक्वेल आहे.
धनंजय सध्या त्याच्या आगामी कन्नड ॲक्शन ड्रामा ‘उत्तरकांडा’साठी तयारी करत आहे. रोहित पदकी दिग्दर्शन करत असलेल्या या सिनेमात ऐश्वर्या राजेश, शिवा राजकुमार, विजय बाबू आणि योगेश भट हे कलाकार आहेत.