Pushpa 2 Premier : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा चालू आहे. गुरुवारी ( ४ डिसेंबर ) सायंकाळी या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा पार पडला होता. हैदराबादमधील संध्या थिएटरबाहेर या प्रीमियर शोसाठी ‘पुष्पा’च्या हजारो चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. मात्र, यादरम्यान चेंगराचेंगरी होऊन यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं. आता या घटनेसंदर्भात Mythri Movie Makers या पुष्पा सिनेमाच्य प्रोडक्शन हाऊसने दु:ख व्यक्त करणारं निवेदन शेअर केलं आहे.
Pushpa 2 सिनेमाच्या प्रोडक्शन हाऊसने निधन झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. याशिवाय तिच्या गंभीर जखमी झालेल्या मुलावर सध्या हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. थिएटरबाहेर जमलेल्या चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी अल्लू अर्जुनने उपस्थिती लावली होती. यावेळी जमावाला नियंत्रित करणं पोलिसांनाही कठीण गेलं. ‘पुष्पा २’ आणि त्यामधल्या कलाकारांची हिच क्रेझ हैदराबादमधल्या महिलेसाठी जीवघेणी ठरली आहे. चेंगराचेंगरी होऊन या महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे.
हेही वाचा : Pushpa 2 च्या निर्मात्यांना मोठा धक्का; ‘या’ प्लॅटफॉर्म्सवर ऑनलाइन लीक झाला चित्रपट
प्रोडक्शन हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “पुष्पा २’च्या स्क्रीनिंग दरम्यान झालेल्या घटनेबद्दल माहिती मिळताच आम्हाला प्रचंड दु:ख झालं. आम्ही संबंधित महिलेच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत. वैद्यकीय उपचार घेणाऱ्या लहान मुलाची प्रकृती लवकरात लवकर ठीक हवी यासाठी आमच्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आहेत.”
We are extremely heartbroken by the tragic incident during last night’s screening. Our thoughts and prayers are with the family and the young child undergoing medical treatment.
— Mythri Movie Makers (@MythriOfficial) December 5, 2024
We are committed to standing by them and extending all possible support during this difficult time.…
दिलसुखनगर येथे राहणारी रेवती (३९) नावाची महिला, तिचा पती भास्कर, मुलगा श्री तेज (९) आणि सान्विका (७) यांच्याबरोबर ‘पुष्पा २’चा प्रीमियर शो पाहण्यासाठी आरटीसी क्रॉस रोडवरील ‘संध्या ७० एमएम’ चित्रपटगृहात गेली होती. अल्लू अर्जुन जेव्हा थिएटरमध्ये आला तेव्हा चाहत्यांनी त्याची झलक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान, रेवती आणि तिचा मुलगा श्री तेज बेशुद्ध झाले. यात महिलेचा मृत्यू झाला असून मुलावर सध्या उपचार सुरू आहेत.