Peelings song Out Now : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित ‘पुष्पा २’ चित्रपट येत्या ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग ‘पुष्पा : द राइज’ २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. त्यामुळे आता प्रदर्शित होणार्‍या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाकडून देखील प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत. काहीच दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर आणि इतर गाणी आली असून यात अल्लू अर्जुनचा अभिनय, डायलॉग्स आणि जबरदस्त डान्स दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या भागात सुद्धा सिनेमातील ‘ऊ अंटावा’, ‘बलम सामे’ ही गाणी अल्लू अर्जुनच्या हटके डान्स स्टाईलमुळे गाजली. पुष्पाच्या दुसऱ्या भागातील ‘किसीक’ हे ‘ऊ अंटावा प्रमाणे आयटम साँग आले. पण पहिल्या भागात ज्याप्रमाणे रश्मिका आणि अल्लू अर्जुन ‘बलम सामे’ वर एकत्र थिरकले होते त्याप्रमाणे या पार्टमध्ये दिसले नव्हते. मात्र चाहत्यांना आता या दोघांना एकत्र डान्स करताना पाहण्याची संधी मिळाली आहे. कारण आता ‘पुष्पा २’ मधील ‘पीलिंग्स’ हे गाणे आले आहे.

हेही वाचा…‘पुष्पा २’ अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये ठरला ‘वाईल्ड फायर’, दिल्लीत १८०० तर मुंबईत तब्बल ‘इतक्या’ रुपयांना होतेय तिकीट विक्री

‘पुष्पा २’ चे ‘पीलिंग्स’ हे गाणे आज (१ डिसेंबर २०२४) सहा वाजून ३ मिनिटांनी युट्युबवर टाकण्यात आले. गाणे युट्युबवर आल्यावर काही मिनिटातच त्याला लाखोंच्या घरात व्ह्यूज आले आहेत. ‘बलम सामे’ गाण्याप्रमाणेच ‘पीलिंग्स’ या गाण्यात रश्मिका आणि अल्लू अर्जुनची जबरदस्त केमिस्ट्री दिसत असून गाण्यावर या दोघांनी दमदार डान्स केला आहे. ‘पीलिंग्स’ हे गाणे खूप एनर्जेटिक असून अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांनी सळसळत्या ऊर्जेने डान्स केला आहे. गाण्यातील स्टेप्स या साऊथच्या ढंगातील जे डान्स असतात तशाच जबरदस्त असून अनेक किचकट स्टेप्स अल्लू अर्जुन आणि रश्मिकाने एकदम सहजरित्या केल्या आहेत.

‘पीलिंग्स’च्या हिंदी व्हर्जन गाण्यात एक तेलुगु ओळ तशीच ठेवण्यात आली असून याच ओळीवर अल्लू अर्जुन आणि रश्मिकाने जबरदस्त हुक स्टेप केली आहे. ‘बलम सामे’ गाण्यासारखेच हे गाणे सुद्धा हिट होईल अशी चर्चा सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचे चाहते करत आहे. सध्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द रूल’ या सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग सुरु असून दिल्लीमध्ये या सिनेमाच्या एका तिकिटाची १८०० रुपयांना विक्री झाली आहे. काही राज्यात ‘पुष्पा २’ चे स्पेशल शो चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा…Video : अल्लू अर्जुनचं मराठी ऐकलंत का? अभिनेत्याने मुंबईकरांशी साधला मराठीत संवाद, म्हणाला…

सॅकलिंकच्या अहवालानुसार आत्तापर्यंत, ‘पुष्पा: द रूल’ ने भारतातील प्रमुख शहरांमध्ये सुमारे ५०,००० तिकिटांची विक्री केली आहे या बुकिंगमधून चित्रपटाने आतापर्यंत सर्व भाषांमध्ये १.५१ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचा रन टाइम तीन तास २० मिनिटे आहे आणि त्याला यू/ए प्रमाणपत्र मिळाले आहे. ‘पुष्पा २’ ची भारतासह विविध देशांत चर्चा आहे आणि या चित्रपटाने आत्तापर्यंत जागतिक स्तरावर अॅडव्हान्स बुकिंगमधून ३० कोटी रुपये कमावले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushpa 2 peelings song out allu arjun and rashmika mandanna electrifying dance goes viral psg