सध्या ‘पुष्पा-२’ची चर्चा सर्वत्र सुरू आहे. ‘पुष्पा-द राईज’च्या यशानंतर या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतायत. पुष्पामधलं सामे गाणं असो वा अॅक्शन सीन्स चाहत्यांनी या चित्रपटाला डोक्यावर उचलून धरलं. आता अडीच वर्षांनंतर पुष्पाचा सीक्वेल १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण, आता या रीलिजची तारीख पुढे ढकलली गेली असल्याने आता हा चित्रपट ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.
चित्रपट पुढे ढकलल्याने चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला आहे. अनेकांनी याबद्दल त्यांच्या सोशल मीडियावर खंत व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे. चाहत्यांच्या भावनांशी खेळल्याबद्दल एका चाहत्याने तर चक्क निर्मात्यांवर गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली आहे.
हेही वाचा… “बेडरूमची खिडकी बंद…” अमेय वाघने बायकोसाठी केली खास पोस्ट शेअर; म्हणाला…
चित्रपट पुढे ढकलल्याची बातमी पुष्पाच्या निर्मात्यांनी जाहीर केली. निर्मात्यांनी नमूद केलं की, त्यांना उर्वरित शूट आणि पोस्ट-प्रॉडक्शनचं काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळेची आवश्यकता आहे. त्यांनी उच्च-गुणवत्तेचा (High Quality) चित्रपट देण्याच्या त्यांच्या वचनावर भर दिला, या स्पष्टीकरणानेदेखील चाहत्यांची निराशा काही कमी केली नाही.
एक्स अॅपवर (पूर्वीचं ट्विटर) चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने लिहिलं, “हा चित्रपट जून २०२४ मध्ये प्रदर्शित होणार होता. तो आता डिसेंबर २०२४ ला का ढकलला आहे. प्रेक्षकांच्या भावनांशी खेळणे हा निर्मात्यांसाठी विनोद आहे का? पुष्पा कम्युनिटीच्या वतीने मी हा चित्रपट लवकरात लवकर रीलिज होण्यासाठी कोर्टात केस दाखल करेन.” या ट्विटचं अनेकांनी समर्थन केलं, जे अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांनी साकारलेल्या पुष्पा राज आणि श्रीवल्लीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत होते.

दुसऱ्या चाहत्याने लिहिलं, “आम्ही पुष्पा-२ ची खूप वाट पाहिली आणि आता आम्हाला हे ऐकायला मिळतंय. आमच्यासाठी याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आम्ही या रीलिजचे दिवस मोजत होतो. कृपया पुनर्विचार करा.”
दरम्यान, सुकुमार दिग्दर्शित, ‘पुष्पा द रूल’ चित्रपट १७ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे, तर फहाद फासिल खलनायकाच्या भूमिकेत झळकला आहे.