दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा सध्याच्या काही आघाडीच्या अभिनेत्यांमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या ‘पुष्पा’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील दमदार कामगिरीने केवळ कमाईचेच रेकॉर्ड मोडले नाहीत, तर त्याला भारतातील सर्वांत लोकप्रिय स्टारही बनवलं. आता त्याचा चाहतावर्गही वाढलाय आणि त्याची कारकीर्दही एका नवीन उंचीवर गेलीय. ‘पुष्पा’मुळे चर्चेत आलेला हा अभिनेता त्याच्या हटके स्टाईल आणि अभिनयामुळे कायमच चर्चेत असतो.

अशातच आता त्याच्याबद्दल अशी चर्चा सुरू आहे की, अल्लू अर्जुन स्वत:चं नाव बदलण्याचा विचार करीत आहे. सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये अभिनेता त्याचं नाव बदलणार असल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. मात्र, त्यानं हा निर्णय का घेतला असावा? अभिनेत्यानं स्वत:चं नाव बदलण्यामागचं नेमकं काय कारण असावं? आणि अल्लू अर्जुन आता त्याचं नवीन नाव काय ठेवणार? ते चला जाणून घेऊ…

‘कोइमोई’ व ‘सिने जोश’ यांच्या वृत्तानुसार, अल्लू अर्जुन अंकशास्त्राप्रमाणे त्याच्या नावात दोन ‘यू’ आणि दोन ‘एन’ जोडण्याची शक्यता आहे. स्वत:च्या यशाला आणखी चालना देऊन, कारकीर्द आणखी बळकट करण्यासाठी अल्लू अर्जुनने नावात बदल करण्याचा निर्णय घेतला असावा, असं म्हटलं जात आहे. अर्थात, अल्लू अर्जुन स्वत:चं नाव बदलणार असल्याच्या दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

अभिनेता अल्लू अर्जुन (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
अभिनेता अल्लू अर्जुन (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

‘पुष्पा-२’नंतर अल्लू अर्जुन चाहत्यांसाठी एक नवा प्रोजेक्ट घेऊन येणार आहे. काही बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक म्हणजे अ‍ॅटली दिग्दर्शित ‘AA22’ नावाच्या या चित्रपटाची घोषणा अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी (८ एप्रिल) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चित्रपटाची अल्लू अर्जुनची चाहते मंडळी वाट पाहत आहेत. त्याशिवाय अल्लू अर्जुनचे आणखी काही आगामी चित्रपटही लवकरच येणार आहेत.

अभिनेता अल्लू अर्जुन (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
अभिनेता अल्लू अर्जुन (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

अल्लू अर्जुन दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांच्याबरोबर एका प्रकल्पावर काम करत आहे. या चित्रपटात अभिनेता भगवान कार्तिकेयची भूमिका साकारणार आहे. निर्माते नागा वंशी यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, हा त्यांचा आगामी नवीन चित्रपट हा महाकाव्य शैलीचा आहे, जो रामायण आणि महाभारतापेक्षा खूप वेगळा असेल. त्यामुळे अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना या चित्रपटाचीही उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान, अल्लू अर्जुनच्या या दोन मोठ्या चित्रपटांबरोबरच त्याचा ‘पुष्पा ३’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दल निर्माते रविशंकर यांनी माहिती दिली होती. याबद्दल त्यांनी आस आम्हटला होतं की, “‘पुष्पा ३’ वर पुढील अडीच वर्षांत काम सुरू होईल. आपण आता २०२५ मध्ये आहोत आणि २०२८ मध्ये ‘पुष्पा ३’ प्रदर्शित होऊ शकतो.” त्यामुळे आता ‘पुष्पा ३’ची ही चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.